• Tue. Nov 4th, 2025

थेट खासदार यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

ByMirror

Oct 25, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मटन मासे मार्केटचे नाव जातीय द्वेषातून बदलल्याचा आरोप

पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून घरचा आहेर

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी येथील नगर-मनमाड महामार्गा लगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मटन मासे मार्केटचे नाव जातीय द्वेषातून बदलण्यात आल्याचा आरोप करुन थेट खासदार यांच्यावरच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप अनुसूचित जाती महिला आघाडीच्या शहर उपाध्यक्षा तथा मार्केटच्या अध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनाद्वारे केली आहे. खासदारांना पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडून घरचा आहेर मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये या विषयावरुन चांगलीच चर्चा रंगली आहे.


नवनागापूर एमआयडीसी हद्दीत सन फार्मा कंपनी चौक ते सह्याद्री कंपनी चौक या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मटन मासे मार्केट गेल्या वीस वर्षापासून चालविण्यात येत आहे. नुकतेच खासदार यांनी या भाजी बाजारचे नवनागापूर भाजीपाला मार्केट असे नाव बदलून उद्घाटन केले. हा प्रकार जातीयवादातून करण्यात आला आहे. तर या रस्त्याच्या कडेला पेव्हिंग ब्लॉक टाकण्याच्या कामाचे देखील उद्घाटन झाले. हे काम झाल्यास सर्वसामान्य शेतकरी, भाजीपाला व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास मनाई केली जाणार असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.


पेव्हिंग ब्लॉकचे काम त्वरीत बंद करावे व जातीयवादातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर भाजीपाला मटन मासे मार्केटचे नाव बदलणाऱ्या खासदारवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा 30 ऑक्टोंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *