• Thu. Oct 16th, 2025

न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचे स्मारक उभारण्याची मागणी

ByMirror

Jun 24, 2024

लोकभज्ञाक चळवळीचा पुढाकार; मुंबई उच्च न्यायालयाकडे मागणी

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील जुने जिल्हा न्यायालयात भारतीय न्यायदानातील निर्भयता आणि निस्पृहता जगभर पसरविणाऱ्या न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचे स्मारक उभारण्याची मागणी लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने करण्यात आली आहे. न्यायव्यवस्थेसाठी दीपस्तंभ असलेल्या प्रभुणे यांचे स्मारक होण्यासाठी संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाकडे मागणी करण्यात आली आहे.


अहमदनगर जिल्हा न्यायालयाला 200 वर्षे झाली. पन्नास वर्षांपूर्वी जिल्हा न्यायालयाच्या इमारतीत न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. स्वातंत्र्योत्तर काळात देशात कायद्याचे राज्य खऱ्या अर्थाने राबविणे आवश्‍यक होते. परंतु न्याय संस्थेमध्ये असणारा भ्रष्टाचार आणि अनागोंदी यामुळे सर्वसामान्य माणसाला सामाजिक आणि आर्थिक न्याय आजपर्यंत मिळालेला नाही. अशा परिस्थितीमध्ये न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांचे कार्य आणि विचार सर्वांसाठी दिशादर्शक व प्रेरणादायी ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


सामान्य माणसाला रस्त्यावर सत्याग्रह करणे आणि न्यायालयाचे दार ठोठावणे याशिवाय पर्याय नाही, परंतु न्याय संस्थेमध्ये न्याय मिळण्यासाठी होणारा विलंब फार मोठा आहे. न्याय मागणाऱ्याला फक्त कोर्टाच्या वाऱ्या करावे लागतात. भारतीय महसूल न्यायालयात होणारे न्यायदान म्हणजे राजरोसपणे न्यायाची खरेदी विक्री असल्याचा आरोप करुन संघटनेच्या वतीने खंत व्यक्त करण्यात आली आहे.


न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुणे यांच्यासारखा मोठा न्यायाधीश स्वातंत्र्योत्तर काळात आजपर्यंत होऊ शकला नाही. याची खंत संपूर्ण देशाला आहे. त्यामुळे न्याय संस्थेमध्ये काम करणारा न्यायाधीश असो किंवा वकील असो प्रत्येकाने न्यायभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती याचा वसा उचलला पाहिजे. संपूर्ण आयुष्यभर न्यायभक्ती आणि न्यायकर्मभक्ती राबविली पाहिजे असा आग्रह लोकभज्ञाक चळवळीने केला आहे. भक्ती, ज्ञान आणि कर्म या भारतीय मानसशास्त्राने तत्वज्ञानाचे मानबिंदू आहेत.

गेल्या पाच हजार वर्षातील लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यावर आधारित लोकभज्ञाक चळवळ व्यापक होत आहे आणि सध्याच्या लोकशाहीला उन्नत पातळीवर नेण्यासाठी लोकभज्ञाकशाही राबविण्यासाठी या चळवळीचा प्रयत्न असल्याचे म्हंटले आहे. प्रभुणे यांचे स्मारक उभारण्यासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, संदीप पवार, विठ्ठल सुरम, कैलास पठारे, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *