• Sun. Feb 15th, 2026

2025 च्या निवडणुकीसाठी जातपडताळणी नियमात सुधारणा करण्याची मागणी

ByMirror

Nov 9, 2025

मागील निवडणुकीतील सादर केलेले जातपडताळणी अर्ज या निवडणुकीतही ग्राह्य धरावे


सौ.सविता कोटा यांचे महसूल मंत्र्यांना निवेदन; ‘नवा अर्ज नाही, जुने प्रकरण ग्राह्य धरा’

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील जातपडताळणीचे सादर केलेले अर्ज या निवडणुकीतही ग्राह्य धरावे, नव्याने अर्जाची सक्ती नको असल्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या माजी जिल्हा सरचिटणीस तथा विद्यमान जिल्हा कार्यकारिणी सदस्य सविता प्रकाश कोटा यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन कोटा यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवून जातपडताळणी प्रकरणांसंदर्भात महत्त्वाची मागणी केली आहे.


त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की, “मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक उमेदवारांनी निवडणूक लढविण्यासाठी जातपडताळणीचे अर्ज जातपडताळणी विभागाकडे सादर केले होते. मात्र काही उमेदवार निवडणुकीत पराभूत झाले असून, त्यांच्या प्रकरणांची नोंद नस्तिबंद करून प्रलंबित ठेवण्यात आली आहे.” त्यामुळे अशा उमेदवारांना 2025 च्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत पुन्हा नव्याने जातपडताळणीचे प्रकरण सादर करण्याची आवश्‍यकता राहू नये, मागील अर्जाच्या आधारेच पात्रता निश्‍चित करण्याचा नियम करावा. अशी मागणी त्यांनी केली आहे.


सविता कोटा यांनी म्हटले आहे की, “मागील प्रकरणाची पावती जोडूनच आरक्षित जागेसाठी उमेदवारी दाखल करता यावी, असे नियम लागू करावेत. अशा नियमानंतर उमेदवारांची बरीच धावपळ, खर्च आणि वेळ वाचेल. प्रत्येक निवडणुकीवेळी नव्याने अर्ज करण्याची प्रक्रिया उमेदवारांसाठी त्रासदायक ठरते. प्रशासनाने मागील अर्ज व पावत्या वैध धरूनच उमेदवारांना संधी द्यावी, यामुळे पारदर्शकतेसह प्रक्रिया सोपी होईल. त्यामुळे निवडणूक तयारीसाठी अधिक वेळ देता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *