कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो हेक्टर्स जंगल आणि पवित्र दंडकारण्य परिसर नष्ट करण्यास विरोध
पीपल्स हेल्पलार्इन व भारतीय जनसंसदचा पुढाकार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत आज प्रदूषण, जागतिक तापमानवाढ, भूजल स्रोतांचा क्षय आणि जंगले नष्ट होण्याच्या गंभीर संकटात आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने नाशिक येथील कुंभमेळ्याच्या नावाखाली हजारो हेक्टर्स जंगल आणि पवित्र दंडकारण्य परिसर नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. या विरोधात पीपल्स हेल्पलाइनच्या माध्यमातून देशभरातील पर्यावरणप्रेमी, विद्यार्थी, वकील, आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन राष्ट्रीय दंडकारण्य सत्याग्रह आरंभ करत असल्याची माहिती ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
जंगले नष्ट करण्याचे संकट फक्त पर्यावरणाची हानी नाही तर आपल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशावर प्रहार आहे. दंडकारण्य म्हणजे केवळ एक जंगल नाही, तर ते रामायणातील पावन भूमी असून भारतीय चेतनेची आत्मा आहे. येथे श्रीराम, सीता आणि लक्ष्मणांनी वनवास भोगला, शबरीच्या भक्तीचा इतिहास आहे, आणि हा परिसर पर्यावरणीय, सांस्कृतिक, आणि आध्यात्मिक गुंफा आहे. या परिसराचा नाश म्हणजे भारतीय अध्यात्माचा आणि निसर्गाचा नायनाट होय. जंगलतोड होऊन नैसर्गिक जलचक्र बिघडेल, डेक्कन पठारावर परिणाम होईल आणि महाराष्ट्राचा तापमान वाढेल, ज्याचा परिणाम भावी पिढ्यांवर दूरगामी होणार असल्याचे असल्याचे ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केले आहे.
कुंभभूमीच्या पवित्र जमिनीत निसर्गविनाश केल्यास तो धर्माचा आणि संस्कृतीचा अवमान होईल. कुंभमेळ्याचा मूळ अर्थ म्हणजे निसर्गाशी ऐक्य आणि शांती, पण या नावाने जंगलतोड केल्यावर ती पवित्रता मिटत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कारण जंगल वाचले तर रामायण जिवंत राहील; दंडकारण्य वाचले तर गोदावरी पवित्र राहील; आणि निसर्ग वाचला तरच भारत सुरक्षित राहील. कुंभमेळ्याचा आध्यात्मिक महत्त्व येथे निसर्गाशी एकरूपतेत आहे. त्यामुळे निसर्गाचा विनाश म्हणजे कुठल्याही अर्थाने स्वीकार्य नाही. या सत्याग्रहासाठी ॲड. कारभारी गवळी, ॲड. श्याम आसवा, अर्शद शेख, डॉ. प्रशांत शिंदे, सुधीर भद्रे, कैलास पठारे, वीरबहादूर प्रजापती, अशोक भोसले, बाळासाहेब पालवे, सुनील टाक, पोपटराव साठे, विजयकुमार शिरसाठ, बबलू खोसला, इकबाल देसाई, रईस शेख, ॲड. बाळासाहेब जाधव, अशोक सब्बन आणि इतर अनेक निसर्गसंरक्षक प्रयत्नशील आहेत.
या प्रकल्पाविरुद्ध सत्याग्रहाचे मुख्य मुद्दे:
दंडकारण्याचा एकही इंच नष्ट होऊ नये, साधुग्रामासाठी पर्यायी जमिनीचा वापर व्हावा, हलक्या आणि निसर्गपूरक रचनेवर भर दिला जावा, दंडकारण्याला राष्ट्रीय पवित्र वनक्षेत्र घोषित करावे, झाडे तोडणे ही धार्मिक, संवैधानिक, व पर्यावरणविरोधीच असल्याचे घोषित करावे, लोकशक्ती, लोकभक्ति, ज्ञानचेतना आणि कर्मभक्तीवर आधारित शांततापूर्ण लढा.
पीपल्स हेल्पलाइनचे आवाहन :
दंडकारण्य हा केवळ जंगल नाही, तर भारताचा प्राणवायू आणि जागतिक तापमानवाढीवरील बळीचा ढाल आहे. या सत्याग्रहात सर्व भारतवासीयांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, कारण हा लढा मानवी जीवनासाठी आणि पृथ्वीवरील जीवनासाठी अनिवार्य आहे. या साऱ्या सामाजिक-पर्यावरणीय आणि सांस्कृतिक संकटावर मात करण्यासाठी, एकात्मिक आणि सहभागी जनचळवळीची गरज आहे. या सत्याग्रहाला जनमानसामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचार करून लोकजागृतीसाठी आणि निसर्ग-संवर्धनासाठी व्यापक समर्थन मिळवणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
