• Thu. Feb 6th, 2025

एमआयडीसी मधील गुन्हेगारी रोखा व उद्योजकांचे प्रश्‍न सोडवा

ByMirror

Jan 30, 2025

आमी संघटनेच्या माध्यमातून उद्योजकांची जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा

कामगारांमध्ये दहशतीचे वातावरण; अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी मधील विविध प्रश्‍न, गुन्हेगारी व अवैध धंदे बंद होण्यासाठी आमीच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ व जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याशी उद्योजकांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत उद्योजकांनी एमआयडीसीत वाढती गुन्हेगारी, अवैध धंदे बंद होण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तर अवैध धंदे चालविणाऱ्या टपऱ्यांचे अतिक्रमण हटविण्याची मागणी लावून धरली.


एमआयडीसीमध्ये अवैध धंदे चालविणारे अनाधिकृत टपऱ्या वाढल्या असताना गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. या टपऱ्यांमध्ये दारू, चरस, गांजा, अफू असे अमली पदार्थ विकले जातात. त्याचे सेवन करून गुन्हेगारीचे प्रमाण या परिसरात वाढत आहे. यामुळे एमआयडीसी मधील कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचा उद्योजकांनी प्रश्‍न उपस्थित केला. सन फार्मा-निंबळक रस्ता काम पूर्ण करावे, अहिल्यानगर औद्योगिक वाढीसाठी नवीन मोठे उद्योग (पॅरेंट कंपन्या) आणणे, पंपिंग स्टेशन ते एमआयडीसी नवीन पाईप लाईन टाकणे, ग्रामपंचायत टॅक्स हा एमआयडीसी कडे वर्ग करावा, टॅक्स आकारणी कंपनीच्या बीबीसी प्रमाणे आकारण्यात यावी, एम ब्लॉक मध्ये रस्त्यावरील कचऱ्यामुळे पसरलेली दुर्गंधी, महावितरणचे नवीन सबस्टेशन उभारण्यासाठी एमआयडीसी क्षेत्रात जागा मिळावी, एल ब्लॉक येथे पोलीस चौकी उभारावी, त्याचप्रमाणे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न आमीचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांनी मांडला.


जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले की, एमआयडीसी मधील उद्योजक हा नगर शहराचा अर्थिक कणा आहे. त्यांच्या माध्यमातून लोकांना रोजगार मिळतो. नुकत्याच मुख्यमंत्री यांनी दावस येथे झालेल्या मिटिंगमध्ये आपल्या जिल्ह्यासाठी पाच ते सहा हजार कोटी रुपये आणले आहेत. महिन्यातून एकदा झूम मीटिंग करून आपल्या छोट्या मोठ्या समस्या सोडवण्यास मदत होईल. कंपन्यामध्ये वेगवेगळ्या अधिकारी चेकिंगसाठी येतात. त्यासाठी एक सिंगल विंडो सिस्टीम राबवू शकतो. एमआयडीसीचा विकास होण्यासाठी आपल्या सगळ्यांना सोबत जावे लागणार असल्याचे स्पष्ट केले.


तर आपल्या जवळील असणारे शहर पुढे निघून गेले आहेत. परंतु आपण हा विचार करत नाही की आपल्या मध्ये काय कमतरता आहे. ते शोधावे लागेल. त्याचप्रमाणे सरकार सर्व गोष्टी आपल्याला पुरवू शकत नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. इंडस्ट्रीसाठी पोषक, भयमुक्त वातावरण तयार करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. आपण सांगितल्याप्रमाणे सन फार्मा ते सह्याद्री चौक या ठिकाणी भाजी मार्केट भरतो. तो खूप मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अपघात होऊ शकतो लवकरात लवकर तो प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल या सर्व विषयावर विभागस्तरीय एक बैठक बोलवून प्रश्‍न सोडवण्यात येतील. एमआयडीसी मधील उद्योजकांच्या तक्रारी सकारात्मक रित्या घेतल्या जातील, असे त्यांनी आश्‍वासन दिले.


जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यानी एमआयडीसी मधील चोरी, खंडणी, धमकी हा गंभीर प्रश्‍न आहे. सर्वात प्रथम उद्योजकांनी जो कोणी गुन्हेगार आहे, त्याच्या विरोध पोलीस ठाण्यात तक्रार दिली पाहिजे. गुन्हेगार पकडण्यासाठी तक्रार करणे गरजेचे आहे. गुन्हेगारी रोखण्यासाठी उद्योजकांनी पुढे आले पाहिजे. कायद्याचा चाप कसा बसवायचा ते आमच्या वर सोडा. महाराष्ट्रात कायद्याच राज्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांसाठी बॅरिकेटिंग करणे, टपऱ्यांचे अतिक्रमण हटवून अवैध धंद्यांवर कारवाई करणाचे त्यांनी आश्‍वासन दिले. तर रात्रीच्या वेळेस पोलीस गस्त वाढविण्याचे स्पष्ट केले. तर कंपनीच्या कॅम्पसमध्ये व बाहेरील बाजूस सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत जेणे करून अजून आपली सुरक्षा व गुन्हेगारी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, पोलीस उपाधीक्षक संपतराव भोसले, प्रांत सुधीर पाटील, किशोर जाधव, शेरकर, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, संजय बंदिष्टी, राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, रवींद्र बक्षी,सतीश गवळी, सागर निंबाळकर, आकाश जोशी, दीपक नागरगोजे, सचिन पाठक, प्रफुल्ल पारख आदी आमी संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *