• Fri. Mar 27th, 2026

भाकप राहुरी पोटनिवडणुक लढविणार

ByMirror

Mar 26, 2026

कॉ. उमेश जोशी यांना उमेदवारी जाहीर


‘बिनविरोध निवडणुकीच्या हालचालींवर सवाल’; कॉ. सुभाष लांडे यांची टीका

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी विधानसभा पोटनिवडणूक भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) लढविणार असल्याची घोषणा पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. भाजप व त्याचे काही मित्र पक्ष ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीत असल्याचा आरोप करत, “मात्र ज्यांच्यासाठी बिनविरोध करावी त्यांचे योगदान काय?” असा सवाल भाकपचे राज्य सचिव कॉ. ॲड. सुभाष लांडे यांनी उपस्थित केला.


बुरुडगाव रोड येथील पक्ष कार्यालयात भाकपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच आयटी इंजिनिअर असलेले युवक कॉ. उमेश जोशी यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. यावेळी कॉ. लांडे अध्यक्षस्थानी होते.


या बैठकीस जिल्हा सहसचिव कॉ. ॲड. सुधीर टोकेकर, कॉ. संदीप इथापे, कॉ. ज्ञानेश्‍वर गायकवाड, कॉ. ज्ञानदेव सहाणे, कॉ. रघुनाथ पवार, प्रताप सहाणे, दशरथ हासे, नारायण मेमाणे, बापू राशिनकर, ज्ञानदेव गायकवाड, सुनील दुधाळे, जफर कुरेशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.


सध्या कांद्याचे भाव पडले असून, शेतकरी वर्ग प्रचंड तणावात आहे. अशा परिस्थितीत शासनाने प्रत्येक शेतकऱ्याला अनुदान द्यावे. तसेच युद्धाच्या परिणामी गॅसच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे, ती ताबडतोब रद्द करण्यात यावी अशी मागणी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.


अध्यक्षीय भाषणात कॉ. सुभाष लांडे म्हणाले की, राहुरी हा कम्युनिस्ट पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. 1972 साली पी.बी. कडू पाटील हे आमदार म्हणून निवडून आले होते. या भागातून खंडकरी व शेतकरी चळवळी उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे शेतकरी, कामगार आणि कष्टकरी वर्गाच्या प्रश्‍नांवर ही निवडणूक लढविण्याची तयारी भाकपने केली आहे.
ते पुढे म्हणाले की, पक्षाने आयटी क्षेत्रातील एक सक्षम व सुशिक्षित उमेदवार दिला आहे. ही निवडणूक जनतेची असून, कोणत्याही घराण्याला मोठे करण्यासाठी नसावी. सध्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेत्यांचे पक्षांतर सुरू असून, काही जण या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. मात्र भाकप एकनिष्ठपणे आणि ठाम विचारसरणीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


उमेदवार कॉ. उमेश जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, कम्युनिस्ट पक्ष हा जागतिक पातळीवरील विचारधारेचा पक्ष आहे. परंतु सध्या कम्युनिस्ट विचार दाबले जात असल्यामुळे अनेक सामाजिक व आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. शेतकरी आणि कामगार वर्गाची गळचेपी सुरू असून, उजव्या विचारसरणीच्या संघटना धर्मांधतेच्या आधारावर सर्वसामान्यांवर हुकूमशाही पद्धतीने प्रभाव टाकत आहेत, असा आरोप त्यांनी केला.


ते पुढे म्हणाले की, समाजाला डाव्या विचारांची नितांत गरज आहे. डावी चळवळ अधिक बळकट करण्यासाठी सर्वसामान्य जनतेने त्यामागे उभे राहणे आवश्‍यक आहे. सुशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून आल्यास जनतेचे प्रश्‍न प्रभावीपणे मांडले जाऊन त्यांचे निराकरण होऊ शकते, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. या बैठकीत भाकपच्या कार्यकर्त्यांनी एकमुखाने राहुरी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला असून, आगामी काळात जोरदार प्रचार मोहीम राबविण्याचा निर्णयही घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *