नगर तालुका हद्दीत बीडच्या माजी डीजीपी यांच्या मुलावर केला होता प्राणघातक हल्ला
नगर (प्रतिनिधी)- बीड जिल्हा व सत्र न्यायालयातील माजी डि.जी.पी. ॲड. रमेश जंजिरे यांचा मुलगा सुशांत जंजिरे व त्यांचा कामगार संतोष खिलारे यांना 2 ऑगस्ट 2023 रोजी भवानी पवार, सागर वाळके व शुभम मोकळे यांनी सय्यद मीर लोणी (ता. आष्टी, जि. बीड) येथील रेल्वे ब्रिज खाली रोडवर आडवे येवून फिर्यादीची मालवाहतूक गाडी अडवून त्यांचे जवळील असलेली पैशाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.
तेव्हा त्यांना झटकून फिर्यादी याने गाडी घेऊन सोलापूर महामार्गाने रुईछत्तीसी मार्गे हातवळण येथे जात असताना फिर्यादी वाटेफळ गावाच्या पुलाजवळ पोहोचले असता त्या ठिकाणी शुभम उर्फ बाबू चौधरी याने त्यांची गाडी आडवी लावली व त्यावेळी पाठीमागून तीन आरोपी सुमारे सात ते आठ किलोमीटर फिर्यादी यांचा पाठलाग करून त्या ठिकाणी पोहोचले. आरोपी व इतर दोघांनी फिर्यादीच्या गाडीचे नुकसान करुन जबर मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. शुभम मोकळे व सागर वाळके यांनी फिर्यादीच्या गाडीतून पैशाची बॅग काढून पळून गेले. जाताना गाडीचे समोरील बाजूने मोठे दगड मारून गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. यामधील जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालय अहिल्यानगर येथे दाखल करण्यात आले होते.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये भवानी पवार, सागर वाळके व शुभम मोकळे व इतर यांच्याविरुद्ध खूनाचा प्रयत्न करून लूटमार केल्याप्रकरणी 307, 327, 325, 341, 336, 324, 323, 504, 427 सह 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुभम उर्फ बाबू चौधरी याने अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यापुढे अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला असता सदरचा जामीन न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर शुभम याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात सादर केले. त्यावेळी देखील सादर केलेला जामीन अर्ज जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी फेटाळला. सदर प्रकरणात गुन्ह्याचा तपास होवून आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले, त्यानंतर आरोपीने पुन्हा जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्यासमोर जामीन अर्ज दाखल केला सदरचा अर्ज देखील जिल्हा न्यायालयाने फेटाळला.
त्यानंतर पुन्हा आरोपीने न्यायालयात चौथ्यांदा जामीन अर्ज दाखल केला होता. त्यावेळी सरकारी वकील व त्यांचे सहाय्यक म्हणून मूळ फिर्यादी यांचे वकील यांनी जामीन अर्जाला विरोध करून सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून, आरोपीवर वेगवेगळे गंभीर गुन्हे दाखल असून आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी न्यायालया समोर कागदपत्रासह दाखल केली.
सदर गुन्ह्यातील साक्षीदार यांना आरोपी फरार असताना आडवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्याबाबत एनसी दाखल होती. सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर दाखल करून सदर गुन्ह्यात आरोपी विरुद्ध आलेले पुरावे पाहून आरोपीचा चौथ्या वेळेला जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. फिर्यादीच्या वतीने ॲड. देवा थोरवे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सुभाष वाघ यांनी सहकार्य केले.