समृद्धी वुमन्स मल्टीपर्पज सोसायटी व स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेचा उपक्रम
महिलांचे सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचा व्यवहारिक विकासासाठी दिशादर्शक उपक्रम -भीमाशंकर लांडे
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- समृद्धी वुमन्स मल्टीपर्पज सोसायटी व स्ट्रॉबेरी लिटिल स्टार प्री-प्रायमरी शाळेच्या वतीने भुतकरवाडी येथे संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर संक्रांत फेस्ट प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनामध्ये शाळेतील विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी सक्रिय सहभाग घेऊन विविध स्टॉल लावले होते. तिळगुळ, वाणाचे साहित्य, घरगुती वस्तू यांसह महिलांनी तयार केलेल्या विविध वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले होते.
या संक्रांत फेस्ट प्रदर्शनाचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष भीमाशंकर लांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा स्वाती डोमकावळे, ॲड. महेश शिंदे, प्रकाश डोमकावळे, धनश्री काळे, सविता सब्बन, सायली गायकवाड, हार्दिक गारदे, सविता पानमळकर, ज्योती म्हसे, गीता इगे, महेंद्र म्हसे, शिवा आढाव, ॲड. मनीषा भिंगारदिवे, आरती गारदे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रदर्शनाला परिसरातील नागरिक, महिला व पालकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संक्रांत सणाच्या परंपरेला आधुनिक स्वरूप देत विद्यार्थी व महिलांनी आपल्या कौशल्याचा प्रत्यय देऊन विविध कलाकुसरीचे साहित्य विक्रीस ठेवले होते. या प्रदर्शनामध्ये महिलांच्या टिकली, सौंदर्य प्रसाधने, रांगोळी, विविध घरगुती साहित्य, तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स विशेष आकर्षण ठरले. लहान मुलांसाठी पतंग व चक्री देखील विक्रीसाठी उपलब्ध होत्या. संक्रांतीसाठी लागणाऱ्या वाण व घरगुती साहित्याच्या खरेदीसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
भीमाशंकर लांडे म्हणाले की,“आजच्या काळात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नसून त्यांना व्यवहारिक अनुभव मिळणे तितकेच महत्त्वाचे आहे. संक्रांत फेस्टसारख्या उपक्रमांतून विद्यार्थ्यांना खरेदी-विक्री, नियोजन, व्यवस्थापन आणि सामाजिक व्यवहाराची ओळख मिळते. महिलांनी तयार केलेल्या वस्तूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना श्रमाचे महत्त्व समजते. अशा उपक्रमांमुळे संस्कार, परंपरा आणि आधुनिक विचार यांचा सुंदर संगम साधला जातो. महिलांचे सक्षमीकरण आणि विद्यार्थ्यांचा व्यवहारिक विकास एकाच वेळी घडविणारे संक्रांत फेस्टसारखे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून, भविष्यातील सक्षम पिढी घडविण्यास निश्चितच हातभार लावतील,” असेही त्यांनी नमूद केले.
स्वाती डोमकावळे म्हणाल्या की, या उपक्रमाच्या माध्यमातून महिलांसोबतच विद्यार्थ्यांनाही शिकण्याची संधी मिळावी, या उद्देशाने संक्रांत फेस्टचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान, आत्मविश्वास, संवाद कौशल्य आणि संघभावना विकसित करण्याची संधी मिळते. संक्रांत हा सण केवळ परंपरेपुरता मर्यादित न ठेवता, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणारा शैक्षणिक उपक्रम म्हणून साजरा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन आपल्या उत्पादनांची विक्री करावी आणि विद्यार्थ्यांनी लहान वयातच उद्योजकतेची ओळख करून घ्यावी, हाच या संक्रांत फेस्टचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.”
