• Wed. Dec 31st, 2025

केडगावच्या सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरात बाल आनंद मेळावा उत्साहात

ByMirror

Dec 5, 2025

विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्‍यक – डॉ. विवेकानंद चेडे


विद्यार्थ्यांनी गिरवले उद्योजकता आणि कौशल्य विकासाचे धडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील डॉ. हेडगेवार शैक्षणिक संकुल संचलित सरस्वती प्राथमिक विद्यालयात बाल आनंद मेळावा उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि कौशल्य विकास होण्याच्या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आनंद लुटला. यावेळी मुलांनी भेळ, पॅटिस,पाणीपुरी, ढोकळा, इडली, मॅगी,तसेच शरीरासाठी पोषक असे पालेभाज्या व फळे हेही विक्री साठी आणण्यात आले होते.


या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन डॉ. विवेकानंद चेडे व डॉ. पल्लवी चेडे यांच्या हस्ते झाले. संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण यांच्या अध्यक्षते खाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी बी.एड कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत, मयुर बांगरे, संस्था समन्वयक गोकुळदास लोखंडे,शालेय व्यवस्थापन समिती सदस्य संभाजीराजे पवार, शाळेचे मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, अवि साठे, शिवाजी मगर आदींसह सर्व शालेय शिक्षक, कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदीप भोर यांनी केले. डॉ. विवेकानंद चेडे म्हणाले की, आपण भारताची संस्कृती ही जोपासली पाहिजे आणि ती जोपासून ती विद्यार्थ्यांच्या अंगी रुजली पाहिजे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहारज्ञान आवश्‍यक आहे. जगात टिकायचे असेल तर आलेल्या संकटावर मात करुन पुढे जात रहावे व स्वतः मध्ये बदल करण्याचे त्यांनी आवाहन केले.


संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवाण म्हणाले की, मोबाईल व टीव्ही मध्ये गुंतून न जाता, मैदानी खेळ खेळा. शरीरिक व्यायाम केले पाहिजे, आपल्याला आपले जीवन वाचवायचे असेल तर शरीरिक कसरत केली पाहिजे. जंक फूड व फास्ट फूड खाणे टाळा, आणि पोषक आहार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.


या बाल आनंद मेळाव्यात विविध साहित्याचे प्रदर्शन, समाजिक संदेश देणाऱ्या रांगोळ्या, आणि विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान होण्यासाठी विविध खाद्य पदार्थांचे स्टॉल थाटण्यात आले होते. विविध उद्योगांवर आधारित प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. बाल आनंद मेळावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह पालकांनी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी यांनी केले. आभार अनिता क्षीरसागर यांनी मानले. सर्व शिक्षकानी आनंद मेळाव्यासाठी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *