संविधानाला अभिप्रेत अशी आपची कार्यपध्दती -ॲड. महेश शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिन व पक्षाचा स्थापना दिवस पेढे वाटून साजरा करण्यात आला. मार्केटयार्ड चौकातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास प्रारंभी अभिवादन करुन संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. यावेळी आपचे ॲड. महेश शिंदे, राजेंद्र कर्डिले, संपतराव मोरे, मेजर रावसाहेब काळे, दिलीप घुले, काकासाहेब खेसे, विक्रम क्षीरसागर, गोविंदराव खरात, संदीप पखाले, डॉ. संतोष गिऱ्हे, पोपट बनकर आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ॲड. महेश शिंदे म्हणाले की, खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांचे समस्या सोडविण्यासाठी आम आदमी पार्टी गेली 11 वर्षांपासून भारतभरात राष्ट्रीय पक्ष म्हणून कार्यरत आहे. संविधानाला अभिप्रेत अशी आपची कार्यपध्दती असून, दिल्ली व पंजाब या राज्यात अतिशय कार्यक्षमतेने सर्वसामान्य व्यक्तींना न्याय मिळेल असे कार्य सुरू आहे. शिक्षण, आरोग्य, विज बिल, पाणी व्यवस्थापन याबाबतचे दूरदर्शीपणाने धोरण राबवून उल्लेखनीय कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

दिलीप घुले यांनी आम आदमी पार्टीची विचारधारा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य युवकांनी हाती घेतले पाहिजे. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून सामाजिक, समता, बंधुता शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांना संरक्षण देण्यासाठी आप कटीबद्ध असल्याचे सांगितले.
राजेंद्र कर्डिले म्हणाले की, भारताचे संविधान सर्व भारतीयांसाठी अनमोल अशी देणगी आहे. भारतातील प्रत्येक नागरिकांचे हक्क, कर्तव्य, अधिकार, जबाबदारी यांची अभ्यासपूर्वक मांडणी संविधानात केलेली आहे. प्रत्येकाने संविधानाप्रमाणे वागले तरच समाजात समता, बंधुता, न्याय, शांतता प्रस्थापित होऊ शकेल, असे ते म्हणाले. यावेळी गोविंदराव खरात व त्यांच्यासह महिला वर्ग आणि युवकांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला.