प्रतिजैविक प्रतिकार रोखा -डॉ. वसंत खळदकर
भारतीय बालरोग तज्ञ संघटनेची देशव्यापी जनजागृती अभियान
नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेच्या वतीने प्रतिजैविकांचा विचारपूर्वक वापर करा, प्रतिजैविक प्रतिकार टाळा, या शीर्षकाखाली देशव्यापी जनजागृती अभियान सुरू केलं आहे. भारतात वाढत चाललेल्या प्रतिजैविक प्रतिकारशक्ती या गंभीर संकटावर लक्ष केंद्रित करुन हे अभियान राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे नागरिक, आरोग्य सेवा पुरवठादार आणि धोरणकर्त्यांना प्रतिजैविकांचा योग्य वापर आणि समुदाय-आधारित जाणीव व जबाबदारी याबाबत जागरूकता निर्माण करण्याचे असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. वसंत खळदकर यांनी दिली.
आज प्रतिजैविक प्रतिकार हा जागतिक आरोग्यासाठी एक गंभीर धोका म्हणून ओळखला जातो. फक्त भारतातच 2019 मध्ये जवळपास 3 लाख मृत्यू प्रतिजैविक-प्रतिरोधक संसर्गांमुळे झाले होते. ग्रामीण भागात ही स्थिती अधिक गंभीर आहे, जिथे आरोग्य सेवांचा अभाव, अपूर्ण उपचार, आणि तपासणीतल्या कमतरतेमुळे प्रतिजैविकांचा चुकीचा वापर सर्रास होतो. प्रतिजैविके हे आधुनिक वैद्यकशास्त्राचं एक मोठं यश आहे, पण त्याचा गैरवापर त्यांची प्रभावीता कमी करत असल्याचे डॉ. खळदकर यांनी स्पष्ट केले.
आपल्या पुढच्या पिढ्यांसाठी ही औषधे प्रभावी ठेवण्यासाठी आता निर्णायक कृती करण्याची गरज आहे. जेव्हा जीवाणू प्रतिजैविक औषधांपासून स्वतःचा बचाव करू लागतात आणि औषधं परिणामकारक राहत नाहीत. यामुळे पुढील परिणाम होतात. आजार अधिक काळ टिकतो आणि रुग्णालयात अधिक दिवस भरती रहावे लागतात. उपचाराचा खर्च वाढतो, पूर्वी बरे होणारे संसर्ग जीवघेणे ठरतात, बहु-प्रतिरोधक सुपरबग्स उदयास येतात.
2022 मध्ये भारतात वापरल्या गेलेल्या प्रतिजैविकांपैकी 59% प्रतिजैविके जागतिक आरोग्य संघटनेच्या वॉच श्रेणीत मोडतात, जी फक्त विशिष्ट प्रसंगी वापरणं आवश्यक आहे. स्वतः औषध घेणे, उपचार अपूर्ण सोडणे, आणि अपात्र किंवा अनौपचारिक व्यक्तीकडून उपचार घेणे हे प्रतिजैविक प्रतिकारशक्तीचे प्रमाण ग्रामीण भागांमध्ये वाढवतात.
भारतीय बालरोगतज्ज्ञ संघटनेचे बहुआयामी धोरण हे अभियान भारत सरकारच्या 2017 च्या राष्ट्रीय कृती आराखडा नॅशनल ॲक्शन प्लॅनला पाठिंबा देते. यामध्ये शिक्षण आणि जनजागृती: विशेषतः ग्रामीण भागात प्रतिजैविक वापराबाबत जनतेमध्ये जागरूकता वाढवणे, ॲसेस गटातील प्रतिजैविकांचा वापर प्रोत्साहित करणे, डब्ल्यूएचओ व ॲसेस गटावर नियंत्रण ठेवणे, क्षमता वाढवणे: आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी सतत वैद्यकीय शिक्षण आणि प्रतिजैविक प्रतिकारशक्ती केंद्रित परिषदांद्वारे प्रशिक्षण, निगराणी व शहाणीवयुक्त वापर: अचूक निदानानुसारच प्रतिजैविके लिहून देणे आणि स्थानिक स्तरावर समित्या स्थापन करणे, स्वच्छता आणि संसर्ग प्रतिबंधन: हात धुण्याच्या सवयी, स्वच्छता आणि संसर्ग नियंत्रण यावर भर देण्यात आला आहे.
ही केवळ वैद्यकीय समस्या नाही, ही सामाजिक जबाबदारी आहे. याबाबत जशी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका आहे, तशीच जनतेचीही सहभागिता महत्त्वाची आहे. जवाबदारीने औषधांचा वापर करा. प्रतिजैविकांचा वापर फक्त आवश्यक असतानाच, योग्य मात्रेत आणि योग्य कालावधीसाठीच करावा. याचा अतिवापर शरीरातील नैसर्गिक सूक्ष्मजीवसमूह बिघडवतो, ज्यामुळे संसर्गांपासून संरक्षण क्षमताही कमी होते. सुशिक्षित नागरिक, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आणि सक्षम धोरण अमलात आणल्यास प्रतिजैविक प्रतिकारशक्ती या गंभीर संकटाचा प्रसार रोखू शकतो आणि भविष्यातील पिढ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवू शकणार असल्याचे डॉ. खळदकर यांनी म्हंटले आहे.