• Fri. Mar 27th, 2026

बसपाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर; राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक

ByMirror

Mar 27, 2026

राहुरी पोटनिवडणूक व जिल्हा परिषद निवडणुकांसाठी चर्चा; जिल्हाध्यक्षपदी सुनील ओहोळ यांची नियुक्ती


बहुजन समाज पार्टी सामाजिक परिवर्तनाची चळवळ -ॲड. सुनील डोंगरे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक शहरात पार पडली. बसपाचे प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नवीन जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आगामी जिल्हा परिषद निवडणुका व राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पक्षाच्या संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेऊन पुढील रणनीती निश्‍चित करण्यात आली.


या बैठकीस पुणे-खानदेश विभागाचे मुख्य झोन प्रभारी रामचंद्र जाधव आणि राज चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रदेशाध्यक्ष ॲड. सुनील डोंगरे यांनी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करताना दक्षिण अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सुनील ओहोळ यांची नियुक्ती केली. जिल्हा उपाध्यक्ष म्हणून शहानवाज शेख यांची निवड करण्यात आली. जिल्हा महासचिवपदी राजू शिंदे यांची फेरनिवड करण्यात आली. तसेच उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी सुरेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली. अहिल्यानगर विधानसभा अध्यक्षपदी निलेश घोडके तर श्रीगोंदा विधानसभा अध्यक्षपदी त्रिंबक साळवे यांची निवड जाहीर करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.


महापालिका निवडणुकीत नगरसेवक म्हणून विजयी ठरलेल्या श्रीपाद छिंदम यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या कार्याचा गौरव करत पक्षाने आगामी निवडणुकांमध्ये अधिक जोमाने काम करण्याचे संकेत दिले. बैठकीदरम्यान प्रत्येक गावात बसपाची शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, असे आवाहन करण्यात आले.


ॲड. सुनील डोंगरे म्हणाले की, बहुजन समाज पार्टी ही केवळ राजकीय पक्ष नसून सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुका आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात जाऊन पक्षाची विचारधारा पोहोचवावी. ‘गाव तिथे शाखा’ हा संकल्प केवळ घोषणा न राहता कृतीत उतरला पाहिजे. संघटन मजबूत असेल तर कोणतीही निवडणूक जिंकणे कठीण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


रामचंद्र जाधव यांनी पुणे-खानदेश विभागात बसपाची ताकद वाढत आहे. अहिल्यानगर जिल्हा हा संघटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. येथे कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केल्यास येणाऱ्या निवडणुकांमध्ये चांगले यश मिळू शकते. युवकांना मोठ्या प्रमाणावर पक्षाशी जोडणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


राज चव्हाण म्हणाले की, आजच्या बैठकीत घेतलेले निर्णय भविष्यातील यशाचा पाया ठरतील. संघटनशक्ती आणि शिस्त या दोन गोष्टींवर पक्ष उभा आहे. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने जबाबदारीने काम केल्यास बसपा निश्‍चितच जिल्ह्यात मजबूत पर्याय ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जिल्हाध्यक्ष सुनील ओहोळ म्हणाले की, आपल्यावर दिलेली जबाबदारी ही मोठी आहे. सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन संघटन वाढवणे आणि प्रत्येक गावात पक्षाची शाखा उभी करणे, हे आपले उद्दिष्ट असेल. येणाऱ्या निवडणुकांमध्ये बसपाचा झेंडा उंचावण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीस भाईचारा कमिटीचे जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव, प्रा. भांबळ मॅडम, शहराध्यक्ष फिरोज शेख पत्रेवाला, राहुरी विधानसभा अध्यक्ष संजय संसारे, ज्येष्ठ नेते सलीम अत्तार, राजू खरात, प्रकाश अहिरे, सुनील मगर, चंद्रकांत दोंदे, अशोक तांबे, चंद्रकांत दोंदे, गणेश बागल, श्याम औटी, दत्तू गिरी, दत्तात्रय सोनवणे, महादेव त्रिभूवन, रोहित खरात, सोनवणे मॅडम आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सुरेश कांबळे यांनी केले, तर आभार सुनील ओहोळ यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *