स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहानिमित्त उपक्रम
ग्रामीण भागातील रक्ततुटवडा भरून काढण्याचा आणि आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तसेच राष्ट्रीय युवा सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निमगाव वाघा (ता. नगर) येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा कार्यालय, मेरा युवा भारत, श्री नवनाथ युवा मंडळ आणि स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम सोमवारी (दि. 12 जानेवारी) आयोजित करण्यात आला आहे.
जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या विशेष घटक युवक कल्याण प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, या शिबिरामध्ये पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री नवनाथ युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे तसेच डोंगरे संस्थेचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.
ग्रामीण भागात निर्माण होणारा रक्ताचा तुटवडा भरून काढणे तसेच नागरिकांना त्यांच्या गावातच मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे. न्यू अर्पण ब्लड बँक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात येणार असून, याचवेळी डॉ. भाग्यश्री पवार या ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करणार आहेत.
युवक-युवतींनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदानासाठी पुढे यावे, तसेच ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेण्याचे म्हंटले आहे. रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सागर कापसे, अशोक भालके, भाऊसाहेब डोंगरे, दादा डोंगरे, अनिल डोंगरे, अशोक जाधव, अतुल फलके, डॉ. विजय जाधव, तेजस केदारी, निकिता रासकर, पिंटू जाधव, मयूर काळे, अभी पाचारणे आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या उपक्रमासाठी ‘मेरा युवा भारत’चे जिल्हा युवा अधिकारी सत्यजीत संतोष, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे तसेच रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
