• Sat. Mar 7th, 2026

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना भालसिंग यांच्याकडून अभिवादन

ByMirror

Mar 7, 2026

अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन मानवंदना


शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर शिवरायांनी स्वराज्य उभारले -विजय भालसिंग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजऱ्या करण्यात येणाऱ्या शिवजयंतीनिमित्त सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी शहरातील जुने बसस्थानक परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्‍वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सागर कपिले उपस्थित होते.


यावेळी बोलताना विजय भालसिंग म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि लोककल्याणकारी राज्यकारभाराचे आदर्श निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आजही समाजाला प्रेरणा व दिशा देणारे आहे. स्वराज्य, स्वाभिमान आणि न्याय या मूल्यांवर आधारित राज्यकारभाराची संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात साकारली. त्यामुळेच शिवरायांचे व्यक्तिमत्त्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान ठरले आहे.


शिवाजी महाराजांनी अवघ्या पंधराव्या वर्षी रामेश्‍वराच्या मंदिरात आपल्या मावळ्यांसमवेत हिंदवी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. त्या काळात देशात सर्वत्र परकीय सत्तांचे राज्य होते. अशा परिस्थितीत स्वराज्याची निर्मिती करणे हे अत्यंत कठीण आणि अशक्यप्राय कार्य होते. समोर निजामशाही, आदिलशाही आणि मुघल बादशाही असे बलाढ्य शत्रू असतानाही शिवरायांनी आपल्या शौर्य, धैर्य आणि बुद्धिमत्तेच्या बळावर स्वराज्याचा पाया मजबूत केला.


या स्वराज्य स्थापनेच्या लढ्यात बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, मुरारबाजी देशपांडे यांसारख्या शूरवीर मावळ्यांनी आपल्या राजांना खंबीर साथ दिली. या वीरांच्या पराक्रमामुळेच स्वराज्याचा विस्तार शक्य झाला आणि इतिहासात हिंदवी स्वराज्याची सुवर्णपाने लिहिली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यकारभारात स्वराज्य, स्वाभिमान, न्याय आणि लोकहित यांना सर्वोच्च स्थान दिले. सामान्य जनतेला सुरक्षित आणि सन्मानाने जीवन जगता यावे यासाठी त्यांनी प्रभावी प्रशासन व्यवस्था उभी केली. धर्मनिरपेक्षता, स्त्री सन्मान, शिस्तबद्ध प्रशासन आणि मजबूत संरक्षणव्यवस्था या तत्त्वांवर त्यांनी आदर्श राज्यकारभार उभा केल्याचे त्यांनी सांगितले.


शिवरायांच्या कुशल नेतृत्वामुळे आणि प्रजाहितदक्ष शासनपद्धतीमुळे त्यांना इतिहासात अद्वितीय स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या विचारांमधून आजही समाजाला प्रेरणा मिळते. त्यामुळे शिवरायांच्या आदर्शांवर चालत स्वराज्याच्या मूल्यांचे जतन करण्याचा संकल्प आपण सर्वांनी करायला हवा, असे आवाहनही विजय भालसिंग यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *