घरगुती देखावा ठरतोय भाविकांचे आकर्षण
नगर (प्रतिनिधी)- शहरातील पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक येथे यंदा गणेशोत्सवात एक वेगळेच आकर्षण नागरिकांना अनुभवायला मिळत आहे. ॲड. संकेत बारस्कर व सौ. निकिता बारस्कर यांनी जय मल्हारांच्या जेजुरी गडाची हुबेहूब प्रतिकृती उभी करून भाविकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा देखावा घरगुती असूनही त्यात केलेली बारकाई, सादरीकरणातील कलात्मकता आणि वातावरणनिर्मिती पाहणाऱ्यांना थक्क करत आहे.
बारस्कर दांपत्याने पुष्ट्या वापरून जेजुरी गडाचा संपूर्ण देखावा उभारला आहे. गडावरील दरवाजे, गडाची भिंत, मुख्य मंदिराचा परिसर, भंडाऱ्याची झालेली उधळण यांचे जिवंत चित्रण या देखाव्यात करण्यात आले आहे. विशेष म्हणजे देखाव्याच्या मध्यभागी श्री गणेशाची आकर्षक मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. गडावर भाविकांप्रमाणेच येथेही नागरिकांना जय मल्हारचा जयघोष ऐकू येत असल्याचा भास होत आहे.
गणेशोत्सवात पारंपरिक सजावटींबरोबरच समाजप्रबोधनात्मक किंवा सांस्कृतिक देखावे उभारले जातात. परंतु, या वेळी बारस्कर दांपत्याने ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या महत्वाचा असलेल्या जेजुरी गडाचा देखावा उभारून एक आगळीवेगळी कल्पना साकारली आहे. परिसरातील नागरिक मोठ्या उत्साहाने या देखाव्याला भेट देत आहे. या देखाव्यामुळे लहान मुलांना जेजुरी गडाबद्दल माहिती मिळत आहे. घरबसल्या जेजुरी गडाचे दर्शन होत असल्याने वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत सर्वांनी या कल्पनेचे कौतुक केले आहे.