• Sat. Jul 19th, 2025

ऑनलाईन केवायसीच्या फसव्या लिंक पासून बँक खातेधारकांना सावधानतेचा इशारा

ByMirror

Mar 29, 2025

ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे आवाहन

बँकेचे बोधचिन्ह वापरून संदेश पाठविण्याचा प्रकार

नगर (प्रतिनिधी)- ऑनलाईन केवायसी करण्याच्या नावाखाली खातेदारांना मोबाईच्या व्हॉट्सअपवर लिंक पाठवून फसवणुकीचे प्रकार होत असताना ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने सर्व खातेदारांना सूचित केले आहे की, कुठल्याही परिस्थितीत या फसव्या लिंकवर क्लिक करू नये.


या घटनांवरुन असे निदर्शनास आले आहे की, बँकेचे विविध खातेदार काही घोटाळेबाजांच्या जाळ्यात अडकत आहेत. हे घोटाळेबाज व्हाट्सअपवर बँकेचे बोधचिन्ह वापरून संदेश पाठवत आहेत आणि त्यात एक लिंक पाठवून खातेदारांना केवायसी अपडेट करण्याचे आवाहन करत आहेत. या फसवणूककारक लिंकवर क्लिक केल्यामुळे खातेदारांची खाती सायबर घोटाळ्याचे शिकार होऊन त्यांची रक्कम चोरीला जात आहे.


बँक कोणतीही लिंक पाठवत नाही आणि केवायसी प्रक्रिया ऑनलाइन करीत नाही. खातेदारांना बँकेच्या याप्रकारच्या फसवणुकीपासून दूर राहण्यासाठी सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर अशा प्रकारची घटना घडल्या तर खातेदारांनी त्वरित बँकेच्या संपर्कात येऊन तसेच जवळच्या पोलीस सायबर सेलशी संपर्क साधण्याचे म्हंटले आहे.


ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी, देविदास तुळजापूरकर यांनी या संदर्भात खातेदारांना जागरूक करण्यासाठी प्रसिध्दीपत्रक काढले आहे. याबाबत काही मार्गदर्शन हवे असल्यास aibomef2014@gmail.com या ईमेलद्वारे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *