कंपनीने निमंत्रित केले कामगारांच्या पत्नींना
कामगारांच्या जीवनातील तणाव दूर करुन दिला व्यसनमुक्तीचा संदेश
अहमदनगर (प्रतिनिधी)- कंपनी व कामगारांचे नाते फक्त व्यावसायिक दृष्टीकोनापुरते मर्यादीत न राहता, कामगारासह त्यांचे कुटुंबीय कंपनीच्या परिवारातील सदस्य म्हणून ऋणानुबंध निर्माण होण्याच्या उद्देशाने एक्साईड कंपनी, स्वराज्य कामगार संघटना व एम्प्लॉयी एंगेजमेंट ॲण्ड सेलिब्रेशन कमिटीच्या संयुक्त विद्यमाने बाईपण भारी देवा! उपक्रम राबविण्यात आले.

या उपक्रमाच्या माध्यमातून एक्साईड कंपनी मधील कामगारांच्या पत्नींना कार्यक्रमासाठी कंपनीमध्ये आमंत्रित करण्यात आले होते. कामगारांच्या जीवनातील तणाव दूर होण्यासाठी व त्यांच्या पत्नींना आपले पती कंपनीत काय काम करतात? याची माहिती देण्यासाठी या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कंपनीत टप्याटप्याने हा कार्यक्रम होत असून, या कार्यक्रमाचे हे चौथे पर्व होते. कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्याचा संदेश व कंपनीच्या परिवारातील सदस्याची जाणीव करुन देणारा हा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे प्लांट हेड संदीप मुनोत, क्लस्टर हेड बसवराज बकाली, सौरव मुखर्जी, प्रवीण बनाफर, विपिन यादव, एजाज अन्सारी, अमोल अटक, हेमा शेळके, मनिषा झावरे, स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष दत्ता तापकिरे, जनरल सेक्रेटरी योगेश गलांडे, सुनील कदम, अभिजित सांबारे, रमेश शिंदे, राहुल जगधने, भरत दिंडे, सचिन खेसे, स्वप्निल खराडे, अजिनाथ शिरसाठ, जितेंद्र तळेकर, दिपक परभणे आदींसह कामगार व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बसवराज बकाली म्हणाले की, एखाद्या कामगाराला चांगला माणूस म्हणून कसा घडवता येईल?, या दृष्टीकोनाने कंपनीच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. वर्षभर राबणाऱ्या कामगारांच्या जीवनातील तणाव देखील दूर करण्याचे काम या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. कामगार वर्ग तणावामुळे व्यसनाकडे वळत असून, त्यांना त्याचे दुष्परिणाम सांगून व कुटुंबाची जबाबदारी लक्षात आणून एकप्रकारे व्यसनमुक्तीचे काम देखील कामगार वर्गामध्ये कंपनीच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
योगेश गलांडे म्हणाले की, कंपनीने कामगारांच्या सदस्यांना परिवारातील सदस्यांप्रमाणे दिलेली वागणुक कौतुकास्पद आहे. कामगार वर्गात जागृती होण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे. यामुळे कामगारांच्या जीवनात आनंद निर्माण होऊन त्यांना आपली खरी कौटुंबिक जबाबदारी समजणार आहे. तर कुटुंबातील सदस्यांना देखील आपले घरचे सदस्य कंपनीत काय कष्ट करतात याची जाणीव होणार असल्याचे त्यांनी सांगितले.