• Sat. Jul 19th, 2025

भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजात बालविवाह आणि बालमजूर दुष्परिणामाची जागृती

ByMirror

Jan 19, 2024

जिल्हा व तालुकास्तरीय बालविवाह, बालमजूर व वंचित दुर्बल घटकांच्या समस्यांवर चर्चा

क्राय संस्थेचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाजातील बालविवाह आणि बालमजूरी रोखण्यासाठी क्राय संस्थेच्या (मुंबई) वतीने अहमदनगर जिल्हा व तालुकास्तरीय बालविवाह, बालमजूर या विषयावर आणि वंचित दुर्बल घटकांच्या समस्यांवर शहरात चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रातून भटके विमुक्त समाजात समुपदेशन व जनजागृतीने परिवर्तन घडविण्याचा निर्धार करण्यात आला.


बाल कल्याण समितीचे अध्यक्ष जयंत ओव्हळ यांच्या अध्यक्षतेखाली टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात झालेल्या चर्चा सत्राप्रसंगी क्राय संस्थेचे कन्सल्टंट राजेंद्र काळे, बाल संरक्षण अधिकारी वैभव देशमुख, सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कवले, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, नलिनी गायकवाड आदींसह आदिवासी, पारधी समाज बांधव व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


प्रास्ताविकात राजेंद्र काळे म्हणाले की, वंचित घटक असलेल्या आदिवासी, पारधी समाजामध्ये बालविवाह, बालकामगार हा गंभीर प्रश्‍न बनला आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाच्या सहकार्याने व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. वंचित घटकांना दिशा देण्यासाठी व त्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. वंचित, उपेक्षित समाजात जनजागृतीचे कार्य करुन सर्वांना बरोबर घेऊन क्राय संस्था कार्य करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


जयंत ओव्हळ म्हणाले की, वंचित घटकातील मुलांच्या शिक्षणाबरोबर बालकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी देखील महत्त्वाची आहे. शाळेत घालण्यासाठी व इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी या समाजातील विद्यार्थ्यांकडे आवश्‍यक कागदपत्र देखील उपलब्ध नाही. त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना आवश्‍यक असणाऱ्या कागपत्र उपलब्ध होण्यासाठी देखील प्रयत्न करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.


हेरंब कुलकर्णी म्हणाले की, उपेक्षित भटक्या समाजातील भावी पिढी शिक्षणाने विकासाच्या प्रवाहात येणार आहे. शिक्षणापासून परिवर्तन घडणार असून, भटक्या समाजाच्या विकासाला चालना मिळणार आहे. तर शिक्षणातून बालविवाह व बालकामगार या अनिष्ट प्रवृत्ती थांबण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या चर्चासत्रासाठी उपस्थित असलेल्या भटके विमुक्त आदिवासी, पारधी समाज बांधवांना मुलांच्या भविष्याच्या दृष्टीकोनाने विविध विषयावर उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *