फिनिक्स सोशल फाऊंडेशनचा उपक्रम; भाविकांनी भरले संकल्पपत्र
नेत्रदानातून अंधारात प्रकाश, अवयवदानातून नवजीवन
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नगर-संभाजीनगर महामार्गावरील महापालिकेच्या शेजारी असलेल्या पावन गणपती मंदिरात गणेश जयंतीच्या पावन पर्वावर फिनिक्स सोशल फाऊंडेशनच्या वतीने नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात आला. गणरायाच्या दर्शनासाठी आलेल्या शेकडो भाविकांना नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच इच्छुक भाविकांकडून संकल्पपत्र भरून घेण्यात आले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी या सामाजिक कार्यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नेत्रदान व अवयवदानाचे संकल्पपत्र भरून आपली सामाजिक बांधिलकी जपली. धार्मिक उत्सवाच्या माध्यमातून मानवतेचा संदेश देण्याचा हा उपक्रम उपस्थित भाविकांच्या मनाला स्पर्श करून गेला.
या उपक्रमाद्वारे नेत्रदान व अवयवदानाबाबत असलेल्या गैरसमजुती दूर करून, मृत्यूनंतरही आपले अस्तित्व दुसऱ्याच्या जीवनात टिकून राहू शकते, हा भावनिक संदेश भाविकांपर्यंत पोहोचविण्यात आला. अनेक भाविकांनी “गणरायाच्या साक्षीने” दानाचा संकल्प करत समाजासाठी योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला.
नेत्रदान व अवयवदान ही केवळ दानाची कृती नसून, ती एखाद्या व्यक्तीस नवे जीवन देणारी आशेची किरणे आहेत. एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना दृष्टी मिळू शकते, तर अवयवदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. ही जाणीव भाविकांमध्ये निर्माण करण्यासाठी फिनिक्स सोशल फाऊंडेशन पुढाकार घेत असल्याचे जालिंदर बोरुडे यांनी सांगितले.
फिनिक्स सोशल फाऊंडेशनने नेत्रदान व अवयवदान चळवळीत सातत्याने योगदान दिले आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दृष्टीहीनांना नेत्रदानाच्या माध्यमातून नवदृष्टी मिळाली असून, अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचे क्षण निर्माण झाले आहेत. धार्मिक सण-उत्सवांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न संस्थेच्या वतीने सुरू असल्याचेही बोरुडे यांनी सांगितले. या उपक्रमास जिल्हा रुग्णालयाचे समुपदेशक सतीश अहिरे यांचे मार्गदर्शन लाभले.
