नारी सतयुग से कलियुग तक! या संकल्पनेतून उलगडले स्त्री चे महात्म्य
सतयुग, त्रेतायुगातील स्त्री सामर्थ्याचे सांस्कृतिक कार्यक्रमातून सादरीकरण
नगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो.च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलच्या पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. नारी सतयुग से कलियुग तक! या संकल्पनेवर सादर करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे नारीचे विविध रूप, विविध पैलू उलगडून स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. या कार्यक्रमात सतयुग, त्रेतायुगातील स्त्रीचे सामर्थ्य, शक्ती आणि महत्त्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रमातून विशद केले. तर नारीशक्तीचा गौरव करत विद्यार्थ्यांनी एकपेक्षाएक सरस नृत्याचे सादरीकरण करुन उपस्थितांची मने जिंकली.
संस्थेच्या डॉ. आर.बी. मोने कला मंदिरात झालेल्या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. गौरव कुलकर्णी व डॉ. रसिका कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वतीपूजन करुन दीपप्रज्वलनाने झाले. याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, विश्वस्त सुनंदा भालेराव, सल्लागार मंडळाचे सदस्य भूषण भंडारी, विद्यालयाचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख अश्विनी रायजादे, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख कांचन कुमार, विद्यार्थी प्रतिनिधी आर्यन दुबेपाटील, विद्यार्थिनी प्रतिनिधी शाल्मली तरवडे आदींसह सर्व अध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविकात छायाताई फिरोदिया म्हणाल्या की, शाळेतून नवनवीन गोष्टी शिकायच्या असतात. शालेय जीवन आयुष्यातील सोनेरी क्षण असतात. या आठवणी जीवनभर विसरता येत नाही. शालेय जीवनात आयुष्याचा पाया मजबूत होत असतो. विद्यार्थ्यांनी अभ्यास करून वेगवेगळ्या स्पर्धेत सहभागी व्हावे. गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्काराची शिदोरी देण्याचे काम संस्थेच्या शाळांमधून होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्राथमिक विभागाच्या संगीत अध्यापिका सुवर्णा मलमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी बहारदार स्वागत गीत सादर करुन पाहुण्यांचे स्वागत केले. विद्यालयातील विद्यार्थिनी शुभ्रा होले व नचिकेत आढाव यांनी मुलाखतीद्वारे प्रमुख पाहुणे डॉ. कुलकर्णी दांम्पत्य यांचा परिचय करून दिला. मुलाखतीमध्ये डॉ. कुलकर्णी यांचा जीवनप्रवास विद्यार्थ्यांनी उलगडला. शालेय जीवनातील आठवणी, पालकांनी दिलेले प्रोत्साहन व संस्कार आणि करिअरची निर्माण झालेली आवड, जीवनात मिळालेली स्फूर्ती आदी विविध प्रश्नांतून डॉक्टर पर्यंतचे ध्येय गाठताना त्यांच्या जीवनाचे यशस्वी वाटचाल जाणून घेतली.
डॉ. गौरव कुलकर्णी म्हणाले की, सकाळी लवकर उठून, दिवसाच्या कामांचे नियोजन करावे. आई-वडिल हे पहिले गुरु व प्रेरणास्थान असतात. स्कूल ज्ञानाचे मंदिर असून, भविष्यातील जीवनात आवश्यक असलेल्या प्रत्येक गोष्टीची तयारी शाळेतून होत असते. मन अधिक चंचल असून, विद्यार्थ्यांनी आपल्या ध्येयावर फोकस करावे. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो, यशासाठी स्वतःला झोकून कठोर मेहनत घ्यावीच लागते, हा संदेश विद्यार्थ्यांना त्यांनी दिला.
छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते डॉ. कुलकर्णी दांम्पत्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शाळांतर्गत विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आली. यादी वाचन संस्कृती गुगळे व ह्रदय मेश्राम यांनी केले.
गणेश वंदनेने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. गणेश वंदनेत माता पार्वतीद्वारे गणेश जन्माची कथा विद्यार्थ्यांनी गजानना गजानना गणराया…. गीतद्वारे मांडली. स्त्री निर्मित ब्रह्मा, विष्णू, महेशचे सादरीकरण नमस्तुते परमशक्तीद्वारे दाखविण्यात आले. तर शक्ती पिठाचे दर्शन घडवित महिषासुर मर्दिनीचे रुपाचे साक्षात्कार विद्यार्थ्यांनी घडविले. उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांना दाद दिली.
सीता मातेच्या जन्पापासून ते स्वयंवर, रावण वध! राम सिया राम…. या गीतातून दाखविण्यात आला. शबरी के बेर, रुद्रानी कालिका माता, वैष्णो देवीचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमातून घडविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आराध्य जोशी व अक्षरा पटवा यांनी केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर्या कुकडे आणि हर्षिता सोमानी यांनी केले. आभार शौर्या सप्रे व ध्रुवी शहा यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व अध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली.