• Sun. Jun 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकशाही मूल्यांचा जागर

ByMirror

Jun 27, 2026
संविधान-पसायदान संगमभूमीचा ‘जनलोक संकल्प’; राजर्षी शाहू महाराज जयंतीनिमित्त लोकशाही मूल्यांचा जागर

अण्णा हजारे यांच्या कर्मभूमीला ‘संविधान-पसायदान संगमभूमी’ घोषित

‘संविधान आणि पसायदानाचा संगम समाजाला नवी दिशा देईल’ -ॲड. कारभारी गवळी

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसद यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील हुतात्मा स्मारक येथे भारतीय संविधान, सामाजिक समता, लोकशाही मूल्ये आणि संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पसायदानातील विश्‍वकल्याणाच्या विचारांचा जागर करणारा ‘जनलोक संकल्प’ कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रतीकात्मक प्रतिच्या मागील कव्हरवर संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या ‘पसायदान’चे पान जोडून संविधानाला नैतिक मूल्यांची जोड देण्याचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाच्या प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, रईस शेख, ॲड. अमित थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विजय शिरसाठ, वीरबहादूर प्रजापती, पोपट भोसले, ज्ञानदेव चांदणे, बाळासाहेब पालवे यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे मनुस्मृती दहन करून सामाजिक समतेचा संदेश दिला होता. त्या ऐतिहासिक घटनेच्या शताब्दीकडे देश वाटचाल करत असताना समाजातून जातीय विषमता, भेदभाव आणि अन्याय पूर्णपणे नष्ट करण्यासाठी संविधानिक मूल्यांचा प्रसार अधिक व्यापक करण्याची गरज असल्याचे आयोजकांनी नमूद केले. ‘जनलोक संकल्प’ अंतर्गत जातीयतेला नकार, धर्मनिरपेक्ष राज्यव्यवस्थेचा स्वीकार, संविधानातील मूलभूत कर्तव्यांचे पालन, संत ज्ञानेश्‍वरांच्या विश्‍वबंधुत्वाच्या विचारांचा प्रसार आणि लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी सामाजिक सहभाग वाढविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.


यावेळी उपस्थितांनी भारताचे संविधान लागू होऊन 75 वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतरही समाजात विषमता, जातीय भेदभाव आणि सामाजिक अन्याय विविध स्वरूपात कायम असल्याचा आरोप केला. तसेच संविधानातील समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यांचा समाजजीवनात अधिक प्रभावीपणे प्रसार होण्याची आवश्‍यकता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या सार्वजनिक जीवनाचा गौरव करण्यात आला. त्यांच्या कार्यामध्ये भारतीय संविधानातील पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख शासनव्यवस्थेची मूल्ये तसेच संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पसायदानातील सर्वजनहिताय आणि सर्वभूतहिताय या तत्त्वांचा संगम दिसून येत असल्याचे नमूद करत त्यांच्या कर्मभूमीला ‘संविधान-पसायदान संगमभूमी’ म्हणून घोषित करण्यात आले.


कर्नाटकचे गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नोंदणी, आर्थिक व्यवहार आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाबाबत उपस्थित केलेल्या प्रश्‍नांचे स्वागत करण्यात आले. लोकशाही व्यवस्थेत कोणतीही प्रभावशाली संस्था सार्वजनिक उत्तरदायित्वाच्या चौकटीत असावी, अशी भूमिका आयोजकांनी मांडली. संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की, या उपक्रमाचा उद्देश भारतीय संविधानात कोणताही बदल करण्याचा नसून संविधानाला नैतिक मूल्यांचे अधिष्ठान देण्याचा आहे. संविधान देशाच्या कायदेशीर व्यवस्थेचा पाया आहे, तर संत ज्ञानेश्‍वर माऊलींचे पसायदान समता, करुणा, विवेक, बंधुता आणि विश्‍वकल्याणाचा संदेश देते. या दोन्ही मूल्यप्रणालींचा संगम समाजाला अधिक न्यायनिष्ठ आणि मानवतावादी दिशा देऊ शकतो, असा विश्‍वास व्यक्त करण्यात आला.


ॲड. कारभारी गवळी म्हणाले की, भारतीय संविधान हे देशातील प्रत्येक नागरिकाला समान न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची हमी देणारे सर्वोच्च मार्गदर्शक तत्त्व आहे. मात्र संविधानातील मूल्ये केवळ पुस्तकापुरती मर्यादित न राहता ती समाजजीवनात रुजली पाहिजेत. संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पसायदानात मांडलेली विश्‍वबंधुत्वाची भावना आणि संविधानातील लोकशाही मूल्ये यांचा संगम घडविणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अशोक सब्बन म्हणाले की, समाजात समता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी प्रत्येक संस्था कायद्याच्या चौकटीत काम करणे आवश्‍यक आहे. लोकशाहीमध्ये प्रश्‍न विचारणे, माहितीची मागणी करणे आणि सार्वजनिक उत्तरदायित्वाची अपेक्षा ठेवणे हा प्रत्येक नागरिकाचा घटनात्मक अधिकार आहे. संविधानाचा सन्मान राखत सामाजिक सलोखा, बंधुता आणि मानवतेची मूल्ये अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले. प्रकाश थोरात यांनी राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संत ज्ञानेश्‍वर माऊली यांनी समाजाला समता, शिक्षण, बंधुता आणि मानवतेचा मार्ग दाखविला. त्यांचे विचार आजच्या पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *