बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान
वारकऱ्यांची काळजी घेऊन आदर्श दिंडीची ख्याती बुरुडगाव ग्रामस्थांनी प्राप्त केली -आ. संग्राम जगताप
ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराने ग्रामस्थ भारावले
नगर (प्रतिनिधी)- बुरुडगाव (ता. नगर) येथील श्री क्षेत्र बुरूडगाव पायी दिंडीचे श्री क्षेत्र पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान झाले. गावात सकाळी ज्ञानोबा-तुकोबांच्या जयघोषात व टाळ मृदंगाच्या गजराच्या भक्तीमय वातावरणात डोळे दिपवून टाकणारा अश्वरिंगण सोहळा पार पडला. वैष्णवांच्या मेळ्यातून माऊली… माऊली… च्या गजरात पालखी भोवती धावलेल्या अश्वाने डोळ्यांचे पारणे फेडले. वारकऱ्यांना सर्वाधिक सुविधा पुरवणारी दिंडी म्हणून या दिंडीकडे पाहिले जाते.

दिंडी सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार संग्राम जगताप व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते शबनम बॅग व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी दिंडीचे प्रमुख संयोजक डॉ. संतोष यादव, किशोर कुलट, जालिंदर तात्या कुलट, बापू औताडे, शनी जनार्धन तांबे, अक्षय लगड, नंदू टिमकरे, ज्ञानेश्वर गायकवाड, फारुक शेख, दिगंबर कर्डिले, चंद्रकांत कर्डिले, नवनाथ मोकाटे, रावसाहेब जाधव, सचिनशेठ धांडे, मेजर गोवर्धन कामीनसे, रामभाऊ वाघ, अशोक भीमराव जाधव, कार्तिक महाराज शिंदे, राजू पवार, पोलीस पाटील कुलट, शिवाजी मोढवे, बुरुडगाव जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. थोरात व शिक्षक वृंद, जनजीवन विद्यालयाचे मुख्याध्यापक झिने, महेंद्र हिंगे आदींसह ग्रामस्थ आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप यांनी बुरूडगाव पायी दिंडीत वारकऱ्यांना विविध सोयी-सुविधा देऊन एक आदर्श दिंडी म्हणून या दिंडी सोहळ्याने ख्याती प्राप्त केली आहे. वारकऱ्यांचा विमा हा अभिनव उपक्रम इतर दिंडी सोहळ्यासाठी प्रेरणा देणारा असल्याचे स्पष्ट करुन वारीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
पंढरपूर येथे बुरुडगावचे स्वतंत्र मठ स्थापन करण्याचे मागील वर्षी घोषणा करण्यात आली होती. या मठाच्या उभारणीसाठी शरद क्यादर यांनी 3 लाख रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली. तर नरेंद्रकुमार फिरोदिया यांनी स्व. शांतीकुमार फिरोदिया यांच्या स्मरणार्थ मठासाठी हॉल देण्याची घोषणा केली. दिंडीत सहभागी होण्यासाठी आलेले पश्चिम बंगाल येथील लष्करी अधिकारी कॅप्टन दिपीतेश यांचा ग्रामस्थांच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दिंडीच्या माहिती पुस्तिकाचे प्रकाशन करण्यात आले.
पारंपारिक वाद्यांच्या गजरात गावात दिंडीची प्रदक्षिणा मारण्यात आली. दिंडीतील महिलांनी फुगड्यांचा फेर धरला होता. दिंडीच्या स्वागतासाठी महिलांनी घरासमोर सडा-रांगोळी टाकली होती. दिंडीच्या अग्रभागी शालेय विद्यार्थी भगवे ध्वज व लेझिम घेऊन सहभागी झाले होते. विठ्ठल-रुक्मिणी व इतर साधू संतांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष करणारे झेंडेकरी, टाळकरी, भजनी मंडळी, फुलांनी सजवलेले रथ व डोक्यावर तुळशी, कळस घेतलेल्या महिला दिंडीत सहभागी झाल्या आहेत. दिंडीतील रथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.
दिंडीचे हे आठवे वर्ष असून, यावर्षीच्या दिंडीत पाचशे गावातील वारकरी मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले आहेत. ह.भ.प. लक्ष्मण महाराज शास्त्री, ह.भ.प. योगेश महाराज यांच्या आशीर्वादाने व ह.भ.प. दीपक महाराज भवर, ह.भ.प. रामभाऊ वाघ, ह.भ.प. कार्तिक महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. प्लास्टिक बंदीचा संदेश घेऊन दिंडी निघाली असून, वारकरी प्लास्टिक पिशव्यांची वापर करत नाही. वारकऱ्यांसाठी रेनकोटची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व दिंडीतील वारकऱ्यांचा विमा उतरविण्यात आला आहे. प्रकाशित झालेल्या दिंडी आनंद यात्रा विशेषांक-2025 स्मरणिकेत दिंडीचे नियोजन, जमा खर्च, भोजन, निवास व्यवस्था देणगीदार याची माहिती समाविष्ट असल्याची माहिती डॉ. संतोष यादव यांनी दिली.
समस्त ग्रामस्थांनी दिंडी सोहळ्यास स्वइच्छेने वर्गणी व उपयोगी साहित्य देऊन दिंडीला शुभेच्छा दिल्या. उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या वतीने दिंडीतील वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी रुग्णवाहिका व निवासी डॉक्टर आणि औषधे उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पोलीस पाटील कुलट यांनी दिडशे महिलांना वारकऱ्यांना साड्या वाटप केले.