वाहन अडवून लाकडी दांडक्याने मारहाण
नगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांचे वाहन अडवून दहा ते बारा अज्ञात व्यक्तींनी लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी सदर अज्ञात व्यक्तींवर नगर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना गुरुवारी (दि.17 जुलै रोजी) नगर कल्याण रोड येथे घडली.
अरुण रोडे (रा. धोत्रे बुद्रुक, ता. पारनेर) गुरुवारी (दि.17 जुलै रोजी) जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पारनेर तालुक्यातील वनकुटा येथे होत असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन बाबत केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपोषणाचे पत्र देण्यासाठी आले होते. त्यानंतर तहसील कार्यालय येथे पत्र देऊन दुपारी 4:15 मिनिटांनी आपल्या चार चाकी वाहनाने घरी चालले असताना कल्याण रोड अमरज्योत हॉटेल ते नेप्ती फाट्याच्या दरम्यान एक मुलगा स्कुटीवर येऊन गाडीला कट मारल्याचे कारण सांगून हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर 18 ते 24 वयो वर्षाचे अनोळखी दहा ते बारा युवक मोटरसायकलीवर आले व गचंडी धरून रोडच्या बाजूला घेऊन लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
यावेळी रिक्षावाल्यांनी त्यातून सोडविले व तेथून पळालो व नंतर हल्लेखोर युवक तेथून निघून गेल्याचे रोडे यांनी फिर्यादीत म्हंटले आहे.
जिल्हा रुग्णालय येथे उपचार घेऊन व नंतर पोलीस स्टेशनला जाऊन दिलेल्या फिर्यादीवरुन शुक्रवारी 18 जुलै रोजी दहा ते बारा अज्ञात व्यक्तींवर सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.