वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे -रावसाहेब काळे
नगर (प्रतिनिधी)- सह्याद्री छावा संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते योगेश पांडुरंग वामन यांची नियुक्ती करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब काळे पाटील यांनी वामन यांच्या नियुक्तीची घोषणा करुन त्यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी तालुकाध्यक्ष दत्ता वामन, धडक जनरल कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्रीधर शेलार, सुभाष काकडे, सुभाष आल्हाट आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्ते योगेश वामन बांधकाम व्यावसायिक असून, विविध क्षेत्रात सामाजिक योगदान देत आहे. वंचितांचे प्रश्न सोडविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे. समाजातील गोरगरीब, गरजू तसेच अडीअडचणीच्या वेळी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती रावसाहेब काळे पाटील यांनी दिली.
सह्याद्री छावा संघटनेच्या माध्यमातून उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले जाणार आहे. संघटनेच्या ध्येय-धोरणाप्रमाणे सामाजिक योगदान दिले जाणार असल्याची भावना नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष योगेश वामन यांनी व्यक्त केली. त्यांच्या नियुक्तीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.