महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल
नगर (प्रतिनिधी)- येथील मराठा समन्वय परिषदेच्या राज्य कार्याध्यक्षा अनिता काळे यांना रणरागिणी संघर्ष रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. संघर्षनामाच्या वतीने सुदाम महाराज गोरखे गुरुजी व माजी मंत्री बबनदादा पाचपुते यांच्या हस्ते काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पेडगाव रोड, श्रीगोंदा येथे झालेल्या या सन्मान सोहळ्याप्रसंगीआमदार विक्रम पाचपुते, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस, माजी सभापती शिवाजीराव ढवळे, विजयाताई गारुडकर, राणीताई फराटे, मीराताई शिंदे, मेजर भीमराव उल्हारे आदी उपस्थित होते.
अनिता काळे या भिस्तबाग जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, सर्वसामान्य घटकातील मुला-मुलींना विद्या दानाचे पवित्र कार्य करुन शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण मोहिम चालवित आहे. महिला सक्षमीकरणाचे कार्य करुन त्यांनी उत्तम प्रकारे महिलांचे संघटन केले आहे. महिलांच्या सक्षमीकरणासाठी उद्योग, व्यावसायिक प्रशिक्षण राबविणे, विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान, चर्चासत्राच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करत आहेत.
व्याख्यानातून राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि विचार घराघरात पोहचवून सक्षम पिढी घडविण्याचे त्यांचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना रणरागिणी संघर्ष रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.