काळे यांच्या सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याची दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- सामाजिक कार्यकर्त्या तथा शिक्षिका अनिता लक्ष्मण काळे यांना सामाजिक, शैक्षणिक व महिला सक्षमीकरणाच्या कार्याबद्दल रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बंधन लॉनमध्ये झालेल्या कार्यक्रमात स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मालिकेतील येसूबाईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांच्या हस्ते काळे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी अभिनेते राजेश नन्नवरे, साहित्यिक संजय कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे, ॲड. धनंजय जाधव, सुप्रिया जाधव, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, उद्योजक राजेश भंडारी, रोटरी क्लबचे अध्यक्ष हरीश नय्यर, सेक्रेटरी कुनाल कोल्हे आदी उपस्थित होते.
अनिता काळे या भिस्तबाग येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका असून, त्या सामाजिक क्षेत्रात मागील दोन दशकापासून सातत्याने सक्रीय योगदान देत आहेत. जिजाऊ ब्रिगेडच्या विविध पदांवर त्यांनी काम केले असून, सध्या त्या हिरकणी ग्रुपच्या अध्यक्ष व मराठा समन्वय समितीच्या राज्य कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत आहे. राजमाता जिजाऊंच्या विचाराने भावी पिढी घडविण्याचे कार्य त्या करत आहे. जिल्हा परिषदेतील शालेय मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी त्यांनी ज्युदो व लाठी-काठीचे प्रशिक्षण देण्याची सुरु केलेली मोहिम व महिला सक्षमीकरणाचे कार्य सुरु आहे. या कार्याची दखल घेऊन काळे यांना रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलच्या वतीने नगररत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
