• Wed. Feb 5th, 2025

शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्‍वसन विकार तपासणी मोहिमेचा प्रारंभ

ByMirror

Jan 30, 2025

भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेचा पुढाकार

लहान बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण रोखण्यासाठीचा देशपातळीवरील उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या निर्देशाप्रमाणे अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने शहरात बालकांमधील रक्तक्षय व श्‍वसन विकार तपासणी मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. या शिबिरातंर्गत बालकांचे हिमोग्लोबीन, लाल रक्तपेशीचे प्रमाण व श्‍वसन प्रक्रियेसंदर्भात 1300 बालकांची तपासणी करण्यात आली. सावेडी, पाईपलाईन रोड येथील आशा एज्युकेशन फाउंडेशन संचलित जय बजरंग प्राथमिक विद्यालयापासून या अभियानाचे प्रारंभ करण्यात आले.
या अभियानासाठी भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या बसच्या माध्यमातून बालरोगतज्ञांनी मुलांची तपासणी केली. यावेळी अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयदीप देशमुख, सचिव डॉ. उज्ज्वला शिरसाठ, खजिनदार डॉ. संदीप गायकवाड, डॉ. सुचित तांबोली, डॉ. सचिन वहाडणे, डॉ. श्‍याम तारडे, डॉ. मकरंद धर्मा, डॉ. नानासाहेब अकोलकर, डॉ. चेतना बहुरुपी, मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर, प्राचार्या पाठक मॅडम आदींसह शालेय शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


देशातील लहान बालकांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण झपाट्याने वाढत असताना हे दूर करण्यासाठी भारतीय बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने या वर्षीचा ऍक्शन प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर मुलांचे केवळ हिमोग्लोबीनचे प्रमाण कमी झाले का व ते योग्य आहे का? तसेच लाल रक्तपेशीचे प्रमाण या उपक्रमाद्वारे तपासणी केली जात आहे.
श्‍वास मोकळा घेणे हे पण प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क आहे, त्यासाठी त्याला कुठे श्‍वास घ्यायला त्रास होतो का?, बालदमा, न्यूमोनिया, श्‍वास घेण्यात काही अडथळा असल्यास त्याचे निदान करणे व त्यावर संबंधित बालकांच्या पालकांना त्याबद्दल जागरूक करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.


या मोहिमेसाठी भारतीय बालरोग तज्ञ संघटनेचे डॉक्टर सभासदांनी देशपातळीवर पुढाकार घेतला असून, हा कार्यक्रम राबविला जात आहे. सदरील आजाराचे निदान करण्यासाठी लागणारी यंत्रसामग्री असलेली आधुनिक बस ही सुरुवातीच्या काळात तेलंगाना व महाराष्ट्र या राज्यांमधील वेगवेगळ्या शहरात नेण्यात येत आहे. बसमध्ये रक्त-हिमोग्लोबिन तपासावयाचे यंत्र आणि श्‍वास कशा पद्धतीने घेणे चालू आहे त्यामध्ये अडथळा आहे का हे तपासावयाचे यंत्राचा समाविष्ट आहे.


या उपक्रमासाठी शाळेच्या प्रशासनाची व पालकांची पूर्वपरवानगी घेऊन बालकांची तपासणी केली जात आहे. बालकांमधील रक्तक्षयाचे निदान व उपचार तसेच बालकांचा श्‍वास हा योग्य रीतीने चालू आहे की, त्यामध्ये काही अडथळा आहे. हे बालरोगतज्ञांमार्फत तपासून त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून वैयक्तिक स्वच्छतेची माहिती देऊन बालकांच्या सदृढ आरोग्याचा कानमंत्र दिला जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्य अहवाल, हिमोग्लोबिनचे प्रमाण, श्‍वासोच्छ्वास बद्दलचा अभिप्राय लिखित स्वरूपात देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती अहिल्यानगर बालरोगतज्ञ संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे.


या उपक्रमासाठी भारतीय बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. वसंत खळतकर, नियोजित अध्यक्ष डॉ.नीलम मोहन, सचिव डॉ. योगेश पारख, महाराष्ट्र आयएमएचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम, महाराष्ट्र राज्य बालरोगतज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ. संजय पाखमोडे, सचिव डॉ. अमोल पवार, खजिनदार डॉ. रविंद्र सोनवणे, उपक्रमाचे समन्वयक डॉ. निखिल पाठक आदींचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *