• Sat. Sep 20th, 2025

दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटलने नवजीवन दिले -सतीश (बाबुशेठ) लोढा

ByMirror

Mar 31, 2024

दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (बीनटाका) शिबिरास नागरिकांचा प्रतिसाद

16 शिबिरात साडेसहा हजारपेक्षा अधिक रुग्णांनी घेतला लाभ; हजारोवर शस्त्रक्रिया

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- व्याधीने ग्रासलेल्या दीन-दुबळ्या रुग्णांना आनंदऋषीजी हॉस्पिटल नवजीवन देण्याचे काम करीत आहे. प.पू. आनंदऋषीजी महाराजांच्या विचाराने सेवाभाव हे ध्येय समोर ठेऊन आदर्शऋषीजी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली या हॉस्पिटलची मुहुर्तमेढ रोवण्यात आली. हॉस्पिटलमध्ये होणारे आरोग्य शिबिर सर्वसामान्यांना आधार मिळत असून, या सेवा कार्यात तन, मन, धनाने सेवा करण्याचे भाग्य लोढा परिवाराला मिळाले असल्याची भावना सतीश (बाबुशेठ) लोढा यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त स्व.श्रीमती श्रीकुवरबाई नारायणदासजी लोढा यांच्या स्मरणार्थ लोढा परिवाराच्या वतीने आयोजित दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (बीनटाका) शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी लोढा बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, डॉ. विजय भंडारी, संजय लोढा, उज्वला लोढा, सुनिता लोढा, भाग्यश्री लोढा, प्रेश्रा लोढा, सुमित लोढा, कुनाल लोढा, सिनिया लोढा, संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. आशिष भंडारी, सुभाष मुनोत, मानकशेठ कटारिया, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, डॉ. भास्कर जाधव, डॉ. रविंद्र मुथा, डॉ. राम पांडे आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 32 व्या स्मृतिदिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध आजारांवरील 16 शिबिरात साडेसहा हजार पेक्षा अधिक गरजूंनी लाभ घेतला. हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया करुन त्यांना नवजीवन देण्याचे कार्य या आरोग्य सेवेच्या मंदिरातून झाले आहे. रुग्णसेवेचे आचार्यजींचे स्वप्न शिबिराच्या माध्यमातून पूर्ण होत आहे. दरवर्षी विविध मोफत आरोग्य शिबिर घेतले जात असून, या सेवाकार्यात लोढा परिवाराचे नेहमीच योगदान मिळत आहे. सतीश (बाबुशेठ) लोढा पत, प्रतिष्ठा बाजूला ठेवून नेहमीच विविध माध्यमातून सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले.


सुभाष गुंदेचा म्हणाले की, आनंदऋषीजी महाराजांचे विचार व प्रेरणा घेऊन जैन सोशल फेडरेशन ध्येयवेडेपणाने गोरगरिबांची सेवा करत आहे. स्वतःचा पैसा, वेळ खर्च करून सर्वसामान्यांना रुग्णसेवा दिली जात आहे. मोठ्या शहराच्या धर्तीवर आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अद्यावत आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने मोठ्या शहरात जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सर्वस्तरातील नागरिक दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ मिळण्यासाठी या हॉस्पिटलकडे मोठ्या आशेने पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.


भाग्यश्री लोढा म्हणाल्या की, संपूर्ण शरीर हृदयाच्या कार्याने चालत असते. तर हृदय माणसाला जगविण्यासाठी 24 तास कार्य करीत असतो. त्याचप्रमाणे समाजातील गरजूंना जगविण्यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचे हृदय म्हणून जैन सोशल फेडरेशन कार्य करत आहे. हॉस्पिटलमध्ये प्रत्येक सदस्य रुग्णांना अद्यावत आरोग्यसुविधा मिळण्यासाठी तळमळीने योगदान देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. प्रकाश कांकरिया यांनी सामाजिक कार्य करण्याची आवड व धडपड असणाऱ्या सतीश (बाबुशेठ) लोढा यांच्या कार्याचे कौतुक करुन वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार केला. डॉ. भास्कर जाधव यांनी दुर्बीणद्वारे बिन टाक्याची होणारी शस्त्रक्रियाची माहिती देवून इतर हॉस्पिटलच्या तुलनेत नागरिकांना अल्पदरात सर्वोत्तम सेवा मिळत असल्याचे सांगितले. या शिबिरात 165 रुग्णांची मोफत तपासणी करुन गरजूंवर दुर्बिणीद्वारे विविध प्रकारच्या बीनटाक्याची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *