• Sat. Feb 21st, 2026

दुर्बल घटकांना आरोग्यसेवेसाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलचा आधार -महापौर ज्योतीताई गाडे

ByMirror

Feb 21, 2026

मेंदू विकार मोफत तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद


60 रुग्णांनी घेतला लाभ; मेंदू विकारावर अल्पदरात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटल हे दुर्बल व सर्वसामान्य घटकांसाठी आरोग्यसेवेचा आधार बनला असून, जिल्ह्यासह राज्यातील विविध भागांतून नागरिक उपचारासाठी येथे येत आहेत. आरोग्यसेवेचे व्रत जपत रुग्णांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य या हॉस्पिटलमधून सातत्याने केले जात असल्याची भावना महापौर ज्योतीताई गाडे यांनी व्यक्त केली.


जैन सोशल फेडरेशन संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या मेंदू विकार मोफत तपासणी शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योतीताई गाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होत्या. याप्रसंगी जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. सुधा कांकरिया, डॉ. वसंत कटारिया, प्रकाश छल्लाणी, सीए आयपी अजय मुथा, अभय गुगळे, माणकचंद कटारिया, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, न्यूरोलॉजिस्ट डॉ. अद्वैत गीते तसेच लहान मुलांचे मेंदू विकार तज्ज्ञ डॉ. स्नेहा म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
महापौर गाडे पुढे म्हणाल्या की, न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांची संख्या कमी असून मेंदू विकारांवरील उपचार अत्यंत खर्चिक असतात. सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना हा खर्च पेलवणे कठीण जाते. पैशाअभावी रुग्णांची होणारी हेळसांड थांबवून त्यांना योग्य वेळी दर्जेदार उपचार मिळणे अत्यावश्‍यक आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना परवडणाऱ्या दरात सेवा देत आहे. गोरगरिबांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणाऱ्या या कार्यासाठी महापालिकेच्या माध्यमातूनही सहकार्य केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.


प्रास्ताविकात संतोष बोथरा यांनी सांगितले की, समाजातील सकारात्मक शक्ती एकत्र आणून आरोग्यसेवेचे व्रत सुरू ठेवले आहे. आनंदऋषीजी हॉस्पिटलनंतर नेत्रालय, युनिव्हर्सिटी तसेच बीड येथेही रुग्णसेवेसाठी प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. बीडमध्ये ऊसतोड कामगारांसाठी हा प्रकल्प जीवनदायी ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात जाऊन नेत्रदोष असलेल्या रुग्णांना हॉस्पिटलमध्ये आणून त्यांच्यावर शस्त्रक्रिया व औषधोपचार करून पुन्हा त्यांच्या गावी सोडण्याची व्यवस्था केली जाते. पूर्वी अवघड शस्त्रक्रियांसाठी मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरात रुग्ण पाठवावे लागत होते; मात्र आता अल्पदरात दर्जेदार सुविधा उपलब्ध होत असल्याने मोठ्या शहरांतील रुग्णही आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी येत आहेत. महात्मा फुले जीवनदायी योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना लाभ देण्याचे कार्य सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे हे आचार्यजींचे स्वप्न असून ते या सेवाकार्यातून पूर्ण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध मोफत आरोग्य शिबिरांची त्यांनी माहिती दिली.


डॉ. अद्वैत गीते यांनी मेंदू विकारांशी संबंधित विविध तपासण्या अल्पदरात उपलब्ध करून दिल्या जात असल्याची माहिती दिली. हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध असून रुग्णांना सर्वसमावेशक उपचार दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. स्नेहा म्हस्के म्हणाल्या की, लहान मुलांमध्ये मेंदू विकार आढळल्यास पालक गोंधळून जातात. मुलाला नेमकी काय समस्या आहे हे समजणे कठीण जाते. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचे योग्य निदान आणि वेळेवर उपचार अत्यंत आवश्‍यक असतात. चालण्यात अडचण, फिट येणे, मतिमंदता, गतिमंदता, आकलन क्षमतेत घट, तोल जाणे अशा विविध समस्यांवर प्रभावी उपचार उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.


या मेंदू विकार मोफत तपासणी शिबिरात डोकेदुखी, मायग्रेन, फिट, हात-पायाला मुंग्या येणे, अपस्मार, नसांवरील सूज, चक्कर येणे, अर्धांगवायू, पॅरालिसिस आदी आजारांवर तपासणी करण्यात आली. एकूण 60 रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. तसेच मेंदू विकारांशी संबंधित विविध तपासण्या शिबिरार्थींना अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. नवनिर्वाचित महापौर ज्योतीताई गाडे यांचा हॉस्पिटलच्या वतीने उपस्थितांनी विशेष सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले, तर आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *