• Sun. Mar 15th, 2026

रोहयोच्या शिवपानंद रस्ते कामात गैरव्यवहाराचा आरोप

ByMirror

Mar 15, 2026

चौकशी होईपर्यंत बिले थांबविण्याची व विभागीय चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी

बोगस मजूर दाखवून लाखोंची बिले काढल्याचा आरोप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद अंतर्गत पारनेर पंचायत समितीच्या हद्दीत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (रोहयो) सुरू असलेल्या शिवपानंद रस्त्यांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोगस मजूर दाखवून व नियमबाह्य पद्धतीने कामे दाखवत अनेक कामांची बिले काढण्यात आल्याची तक्रार अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.


या संदर्भात विभागीय स्तरावर चौकशी समिती स्थापन करून संपूर्ण कागदपत्रांची आणि प्रत्यक्ष कामांची सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत रोहयोच्या शिवपानंद रस्ते कामांची कोणतीही बिले अदा करू नयेत, अशी मागणी समितीच्या वतीने नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, पारनेर पंचायत समिती अंतर्गत विविध ग्रामपंचायतींमध्ये रोहयो योजनेंतर्गत शिवपानंद रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. मात्र या कामांमध्ये रोजगार सेवक व ठेकेदार यांनी संगनमत करून बोगस मजूर दाखवण्याचा प्रकार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही मजूर वयोवृद्ध असतानाही त्यांना कामावर दाखवण्यात आले आहे, तर काही मजूर इतर ठिकाणी काम करत असतानाही त्यांच्या नावांची नोंद मस्टर यादीत करण्यात आली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.


याशिवाय काही ठिकाणी मजुरांच्या कुटुंबीयांची नावेही मस्टरमध्ये दाखवून आर्थिक व्यवहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. रोहयो योजनेंतर्गत काम करणाऱ्या मजुरांचे वेतन थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणे अपेक्षित असताना काही रोजगार सेवकांनी मजुरांना रोख रक्कम दिल्याचे दाखवून मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.


समितीच्या मते, या कामांमध्ये काही शासकीय अधिकाऱ्यांचेही संगनमत असल्यामुळे शासनाच्या नियमानुसार कारवाई होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी शिवपानंद रस्त्यांची कामे प्रत्यक्षात न करता केवळ कागदोपत्री पूर्ण दाखवून बिले काढण्याचा प्रकार होत आहे. रोजगार सेवक व त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे मस्टरवर दाखवून पगार काढून घेण्यात आल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या पार्श्‍वभूमीवर पारनेर तालुक्यात सुरू असलेल्या सर्व शिवपानंद रस्त्यांच्या कामांची विभागीय स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच शासकीय निधीचा अपहार केल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.


तसेच चौकशी पूर्ण होईपर्यंत या कामांशी संबंधित कोणतीही बिले अदा करू नयेत. जर चौकशीपूर्वी बिले अदा करण्यात आली तर नंतर उघडकीस येणाऱ्या आर्थिक अपहारास संबंधित अधिकारी जबाबदार धरून त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *