रेल्वे स्टेशन रोडच्या लोखंडे पुलावर झाली होती मारहाण
नगर (प्रतिनिधी)- रेल्वे स्टेशन रोडच्या लोखंडे पुलावर झालेल्या मारहाण प्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विविध कलमान्वये आर्म ॲक्टसह गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी चैतन्य गाडळकर, ऋषभ लोढा व विरेंद्र भारती यांना जिल्हा सत्र न्यायाधीश कोर्टाने निर्दोष मुक्तता केली.
17 ऑगस्ट 2021 रोजी फिर्यादीला त्याचा चुलत भाऊ याचा फोन आला की, भाऊ तू लवकर ये लोखंडी पुलावर रेल्वे स्टेशन रोड येथे चैतन्य व त्याचे मित्र मला अडवून मारत आहे. त्यावेळी फिर्यादी येथे गेला असता चैतन्य गाडळकर, ऋषभ लोढा, विरेंद्र भारती व इतर पाच ते सहा अनोळखी इसम फिर्यादीच्या भावाला लाथा बुक्क्याने मारहाण करीत होते. त्यावेळी फिर्यादीने आरोपींना विचारले, अरे भाऊ का मारत आहे? त्यावर ते म्हणाले की, तू विचारणारा कोण आहे? असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ केली व आरोपीने फिर्यादीच्या डोक्यात कोयता मारला व लाथा बुक्क्यांनी मारले व फिर्यादीच्या भावाला देखील मारहाण केली.
त्या ठिकाणी लोकांची गर्दी झाल्यानंतर आरोपी त्या ठिकाणाहून निघून गेले. याबाबत चैतन्य गाडळकर, ऋषभ लोढा, विरेंद्र भारती यांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी 307, 341, 143, 147, 148, 149, 323, 504, 506, 427 आर्म ॲक्ट 4, 25 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. सदरच्या गुन्ह्यामध्ये पोलीस तपासत आरोपींना अटक झाली होती.
सदर आरोपी विरुध्द ठोस पुरावा न आल्याने व तसा युक्तिवाद ग्राह्य धरून अतिरिक्त सत्र न्यायाधीश सी.एम. बागल यांनी आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने ॲड. आकाश कावरे, ॲड. संजय वाल्हेकर, ॲड. राजेश कावरे व ॲड. कैलास कोतकर यांनी काम पाहिले.