• Thu. Oct 16th, 2025

अहमदनगर आयुक्तांनी मागितली 8 लाखाची लाच

ByMirror

Jun 28, 2024

आयुक्तांसह लिपिक अडकले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पैसे घेऊन शहरातील बांधकाम परवानगीचा विषय पुन्हा चव्हाट्यावर

अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे व त्यांचे लिपिक शेखर देशपांडे यांच्यावर 8 लाख रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी कारवाई केली असून, याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


लाचलुचपत विभागाने मोठी कारवाई केली असून, त्यांच राहत घर आणि मनपा कार्यालयातील त्यांची केबिन सील करण्यात आली आहे. तर देशपांडे यांच्या बुऱ्हाणनगर येथील घरावर देखील छापा टाकण्यात आला आहे. बांधकाम परवानगीसाठी लिपिक शेखर देशपांडे यांच्या मार्फत आयुक्तांनी लाचेची मागणी केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईची कुणकुण लागताच आयुक्तांसह लिपिक पसार झाले आहेत.


गुरुवारी (दि.27 जून) सकाळ पासूनच शहरात महापालिकेतील मोठा अधिकारी लाचेच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा सुरु होती. दुपारी आयुक्तांसह लिपिकांचे नाव पुढे आल्याने अनेकांचे धाबे दणाणले. या कारवाई संबंधीची मोठी गुप्तता पाळण्यात आली असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथक मागील दोन दिवसापासून शहरात दाखल झाले असल्याची माहिती सूत्रांकडून कळाली आहे.


तक्रारदार हे त्यांच्या भागीदारांसह बांधकाम व्यवसाय करतात. त्यांनी अहमदनगर महानगरपालिका हद्दीतील मौजे नालेगाव येथे 2260.22 चौरस मीटर प्लॉट खरेदी केलेला आहे. सदर प्लॉटवर तक्रारदार यांना त्यांचे भागीदारांसह बांधकाम करावयाचे असल्याने त्यांनी बांधकामासाठी लागणारी बांधकाम परवानगी मिळण्यासाठी महानगरपालिका कार्यालय अहमदनगर येथे ऑनलाईन अर्ज केला होता. सदर परवानगीसाठी आयुक्तां मार्फत देशपांडे यांनी 9 लाख 30 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली. यानंतर तक्रारदाराने जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीवरुन लाच मागणी पडताळणी 19 जून ते 20 जून दरम्यान करण्यात आली. या प्रकरणात तडजोडीने तक्रारदारकडून 8 लाख रुपयाची मागणी आयुक्त जावळे यांच्याकडून लिपिक देशपांडे यांनी मागणी केल्याचे पंचा समक्ष समोर आले.


जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक किरण बिडवे, पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावण्यात आला होता. यासाठी छत्रपती संभाजी नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांचे मार्गदर्शन लाभले. सापळा पथकात पोलीस अंमलदार गजानन घायवट, शिवाजी जमधडे, गणेश चेके, गणेश बुजाडे , शिवलिंग खुळे, अतिश तिडके, गजानन खरात विठ्ठल कापसे, भालचंद्र बिनोरकर यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *