छबु पैलवान तालमीत रंगले कुस्त्यांचे डावपेच
विजयी मल्ल जिल्हा निवड चाचणीसाठी पात्र
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहर तालीम संघाच्या वतीने वरिष्ठ राज्यस्तरीय गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा (अधिवेशन) व महाराष्ट्र केसरी किताब लढत 2023 स्पर्धेसाठी शहर निवड चाचणी कुस्ती स्पर्धा उत्साहात पार पडली. सर्जेपूरा येथील छबु पैलवान तालीम मध्ये झालेल्या निवड चाचणी स्पर्धेत मल्लांचे रंगतदार कुस्त्या रंगले होते.
पै. श्याम लोंढे यांच्या हस्ते कुस्ती आखाड्याचे पूजन करुन व मल्लांची कुस्ती लाऊन निवड चाचणी स्पर्धेला प्रारंभ करण्यात आले. यावेळी जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, शहर तालीम संघाचे अध्यक्ष पै. नामदेव लंगोटे, उपाध्यक्ष पै. विलास चव्हाण, पै. सुनील भिंगारे, पै. कैलास गर्जे, सचिव पै. मोहन हिरणवाळे, नाना कोतकर, संजय शेळके, सोमनाथ राऊत आदी उपस्थित होते.

पै. वैभव लांडगे म्हणाले की, यावर्षी जिल्ह्यातून निवड चाचणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्व तालुक्यातून निवड चाचणी पार पडली. यामधील विजयी मल्ल जिल्हा निवड चाचणीसाठी खेळणार आहे. जिल्हा निवड चाचणीत पहिल्यांदाच वरिष्ठ महाराष्ट्र केसरी गटातील गाती व माती विभागासाठी प्रत्येकी दोन किलो चांदीची गदा बक्षीस ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पै. नाना डोंगरे म्हणाले की, दिग्गज मल्लांचा वारसा नगर जिल्ह्याला लाभला असून, अनेक नवीन मल्ल कुस्ती क्षेत्रात पुढे येत आहे. कुस्तीला चालना देण्याचे काम अहमदनगर जिल्हा तालीम संघाच्या वतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिव (उस्मानाबाद) येथे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार असून, या स्पर्धेला जिल्ह्याचा संघ पाठविण्यासाठी निवड चाचण्या होत आहे. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा निवड चाचणी रविवारी (दि.22 ऑक्टोबर) रोजी केडगाव येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहराची निवड चाचणी पार पडली.

राज्यस्तरीय वरिष्ठ गादी व माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी 57, 61, 65, 70, 74, 79, 86, 92, 97 व महाराष्ट्र केसरी 86 ते 125 किलो वजन गटसाठी निवड चाचणी स्पर्धा पार पडली. स्पर्धेसाठी शंभरपेक्षा अधिक मल्लांचा सहभाग लाभला. या निवड चाचणीसाठी पंच म्हणून सोमनाथ राऊत व पै. नाना डोंगरे यांनी काम पाहिले.
यामधील विजयी मल्ल गादी विभागसाठी रोहित बनसोड, अभिषेक कर्पे, चैतन्य शेळके, सिध्दांत पवार, अक्षय घोडके, ऋषीकेश लांडे, राहुल ताकवणे, तर माती विभागसाठी तेजस वारुळे, तेजस आरडे, प्रविण गीते, लक्ष्मण धनगर, महेश सुळ, ओम खंडागळे, साईराज भोसले, मयुर जपे, महाराष्ट्र केसरी माती विभागसाठी शुभम लोंढे या मल्लांची जिल्हास्तरीय निवड चाचणीसाठी निवड झाली आहे.