• Wed. Feb 11th, 2026

पोलीस कारवाईस जाणीवपूर्वक दिरंगाईचा आरोप

ByMirror

Feb 10, 2026

अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा एसपी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

16 फेब्रुवारीपासून उपोषण; कारवाई न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर शहर, पारनेर व अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी व गुन्ह्यांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जात नसल्याचा आरोप अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आला आहे. वारंवार लेखी पत्रव्यवहार करूनही संबंधित पोलीस ठाण्यांकडून ठोस कारवाई होत नसल्याने शासन नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.


या सर्व प्रकरणांबाबत तातडीने कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्याकडे करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने समितीने 16 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.


समितीच्या वतीने मांडण्यात आलेल्या प्रमुख तक्रारीप्रमाणे; पारनेर पोलीस स्टेशनमध्ये दाखल एफ.आय.आर. क्रमांक 0076, दिनांक 03 फेब्रुवारी 2026 नुसार सी.सी.टी.व्ही. फुटेज उपलब्ध असतानाही आरोपीस अटक करण्यात दिरंगाई होत असून तपास जाणीवपूर्वक लांबविला जात आहे. तसेच एफ.आय.आर. क्रमांक 0038, दिनांक 26 जानेवारी 2026 नुसार गुन्ह्यात वापरलेले डंपर वाहन जप्त करून तहसील कार्यालय, पारनेर यांच्याकडे हस्तांतरित करण्यातही विलंब केला जात आहे.


याशिवाय एफ.आय.आर. क्रमांक 0003, दिनांक 04 जानेवारी 2026 अंतर्गत जप्त करण्यात आलेले वाहन आजतागायत तहसील कार्यालयाकडे हस्तांतरित करण्यात आलेले नाही. अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनच्या आशिर्वादाने माळीवाडा व रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेले बिगो, तिनपत्ते व टायगर क्लब यांसारखे जुगार अड्डे बंद करण्याबाबत वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही कारवाई झालेली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.
तसेच अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन भिंगार अंतर्गत रुईछत्तीसी व वाटेफळ हद्दीत हायवेवर सुरू असलेला वेश्‍या व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याबाबत पत्रव्यवहार करूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे. अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल एफ.आय.आर. क्रमांक 0610/2025, दिनांक 18 जुलै 2025 रोजीच्या हल्ला प्रकरणातील आरोपींना आजअखेर अटक करण्यात आलेली नाही.


याचबरोबर नगर-जामखेड रोडवरील कोल्हेवाडी फाटा येथे खुलेआम सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे विषारी दारू पिऊन एकनाथ वाघमारे (रा. सावरोली, ता. खोपोली, जि. रायगड) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडूनही संबंधित आरोपीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा गंभीर आरोप समितीने केला आहे.
वरील सर्व तक्रारींबाबत वारंवार निवेदने देऊनही पारनेर पोलीस स्टेशन, अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशन व कोतवाली पोलीस स्टेशनकडून जाणीवपूर्वक कारवाईस टाळाटाळ केली जात असून आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारी 2026 पासून अनेक सामाजिक संघटनांसह पीडित नागरिकांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *