श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या ठेवीदारांची मागणी
शिष्टमंडळाचे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीत ठेवीदारांच्या अडकलेल्या रकमा परत मिळण्यासाठी न्यायालयाच्या आदेशान्वये संचालक मंडळाची मालमत्ता विक्री करण्याचे निवेदन उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी सुधीर पाटील यांना ठेवीदारांच्या वतीने देण्यात आले.
गुरुवारी (दि.4 जुलै) ॲड. सुरेश लगड यांच्या मार्गदर्शनाखाली ठेवीदारांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी यांची भेट घेऊन ठेवी परत मिळण्यासंदर्भात चर्चा केली. यावेळी ॲड. लगड, दिनकरराव देवतरसे, अण्णा फुलारी, वसीम सय्यद, बाबासाहेब शेवाळे, सुधाकर डोंगरे, नामदेव गुडगळ, हबीब शेख, प्रतीक बैरागी, गणेश गीते आदी उपस्थित होते.
श्रीनाथ मल्टीस्टेट अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटीचे संचालक मंडळाने ठेवलेल्या ठेवीची रक्कम काढून घेऊन, त्याची अफरातफर केलेली आहे.
जवळपास एकंदरीत कोट्यावधी रुपयांची अफरातफर होऊन 65 कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेत अडकल्या आहेत. याप्रकरणी जिल्हा न्यायालयात सर्व संचालक व मॅनेजर यांच्याविरुद्ध विशेष खटला दाखल आहे. त्या खटल्यात न्यायालयाने शासनाला संचालक मंडळाची शेतजमिनी, मिळकत लिलाव करण्यास परवानगी दिलेली आहे. अनेक ठेवीदार सेवानिवृत्त कर्मचारी असल्याने त्यांना इतर कोणताही उत्पन्न नाही, अशा परिस्थितीत न्यायालयाच्या आदेशाने संचालक मंडळाच्या मिळकती विक्री करून ठेवीच्या रकमा मिळण्याची मागणी ठेवीदारांनी केली आहे.