प्रभाग 7 ड मध्ये भरत खाकाळ यांच्या प्रचारार्थ रॅली
विकास, पारदर्शकता व स्वच्छ राजकारणाचा ‘आप’चा निर्धार
टक्केवारीच्या राजकारणामुळे प्रभागाचा विकास रखडला -भरत खाकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना, आम आदमी पार्टीने (आप) देखील निवडणूक रिंगणात दमदार एन्ट्री केली आहे. प्रभाग क्रमांक 7 ड मधून आपचे उमेदवार भरत खाकाळ यांनी प्रचाराचा जोर वाढवत आपल्या समर्थकांसह प्रचार रॅली काढली.
ढोल-ताशांचा गजर, जोरदार घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उत्साहात ही रॅली प्रभागातील विविध भागांतून काढण्यात आली. रॅलीदरम्यान “प्रभागाचा विकास, स्वच्छ प्रशासन” अशा घोषणा देण्यात आल्या. उमेदवार भरत खाकाळ यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
रॅलीनंतर उमेदवार व कार्यकर्त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत घरोघरी जाऊन गाठीभेटी घेतल्या. नागरिकांच्या समस्या, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, पाणी, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आदी प्रश्न ऐकून घेण्यात आले. नागरिकांनीही आपल्या अपेक्षा आणि अडचणी मोकळेपणाने मांडल्या.
भरत खाकाळ म्हणाले की, “महापालिकेत टक्केवारीच्या नगरसेवकांमुळे प्रभागाचा विकास होत नाही. सत्ताधारी आधी स्वतःचा विकास साधतात आणि नंतर प्रभागाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळत नाही.” प्रभागातील प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी स्वच्छ प्रतिमा असलेले, अभ्यासू व निष्कलंक उमेदवार निवडून देणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. “विकास, पारदर्शकता आणि जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या उमेदवारांनाच संधी द्यावी,” असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
आम आदमी पार्टीच्या वतीने स्थानिक पातळीवर पाणीपुरवठा, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सेवा, शाळा व सार्वजनिक सुविधा या मुद्द्यांवर ठोस काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. दिल्ली व इतर राज्यांतील ‘आप’च्या कामगिरीचा दाखला देत, अहिल्यानगरमध्येही पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन देण्याचा विश्वास उमेदवारांनी व्यक्त केला.
