• Thu. Apr 17th, 2025

पर्यावरण रक्षणासाठी नवा दृष्टिकोन

ByMirror

Apr 9, 2025

पर्जन्यमान आणि धनराई शाश्‍वततेसाठी जाणीव-चालित पर्यावरणीय क्रांती -ॲड. कारभारी गवळी

नगर (प्रतिनिधी)- ऊर्जा, माहिती आणि जाणीव यांच्यातील सुसंवाद साधून शाश्‍वत पर्यावरणीय उपाययोजना उभारता येतात, असे प्रतिपादन पीपल्स हेल्पलाइनचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. कारभारी गवळी यांनी केले आहे. पर्जन्यमान आणि धनराई या दोन संकल्पनांचा ऊहापोह केला. या दोन्ही क्रांतिकारी पद्धती जलसंवर्धन, कोरडवाहू शेती आणि पर्यावरणीय संतुलनासाठी उपयोगी ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.


भूमिगत जलसाठवण व ओलावा टिकवणारी यंत्रणा पर्जन्यमानासाठी महत्त्वाची आहे. जागतिक तापमानवाढ आणि कृषी संकटांच्या पार्श्‍वभूमीवर जलसंवर्धन अत्यावश्‍यक आहे. पर्जन्यमान ही संकल्पना पावसाचे पाणी बाष्पीभवन होण्यापूर्वी भूमिगत साठवण्यावर आधारित आहे.


यामध्ये तीन प्रमुख टप्पे असतात. जलद पाणी साठवण:- पावसाचे पाणी विशिष्ट खड्ड्यांमध्ये किंवा खंदकांमध्ये वळवले जाते, रेन बॅटरी साठवण:- खड्ड्यांमध्ये मुरुम व दगड भरून झिरपण्यास मदत केली जाते, ओलावा टिकवणूक:- साठवलेले पाणी झाडांच्या मुळांना पोषण देते व माती आरोग्य सुधारते.


ही प्रक्रिया गुरुत्वाकर्षणावर आधारित असून, भूजल पातळी वाढवते, जैवविविधता प्रोत्साहित करते आणि मातीची धूप रोखते. ही एक पर्यावरणीय जाणीवेवर आधारित क्रांती असल्याचे ॲड. गवळी म्हणाले.


धनराई ही पर्जन्यमानच्या तत्त्वांवर आधारित शेती पद्धत असून, ती कोरडवाहू क्षेत्रातील पुनरुज्जीवन करते. यामध्ये आंबा, पेरू, शेवगा आणि औषधी वनस्पतींची लागवड केली जाते. या प्रणालीत सेंद्रिय खतांचा वापर, सूक्ष्म सिंचन प्रणाली (ठिबक सिंचन) आणि पाण्याचा कार्यक्षम वापर केला जातो. यामुळे पडीक जमिनीचे हिरव्या बागांमध्ये रूपांतर, हवामान बदलाशी लढा, शाश्‍वत शेती व स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन मिळणार आहे.


ॲड. गवळी म्हणाले की, धनराई म्हणजे निसर्गाच्या देणगीचा सुज्ञ वापर असून ती शेतीसाठी एक समग्र, विज्ञान व अध्यात्मिक मूल्यांनी प्रेरित पद्धत आहे. पर्जन्यमान आणि धनराई केवळ वैज्ञानिक उपाय नाहीत तर एक जाणीवपूर्वक जीवनशैली आहे. निसर्गाशी भक्तीभाव, ज्ञान आणि कर्माच्या आधारे संबंध ठेवत आपण पृथ्वीला शाश्‍वत आणि समृद्ध बनवू शकतो. या पद्धतींचा अवलंब केल्यास पाणी सुरक्षा, अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय समतोल साधला जाऊन भविष्यातील पिढ्यांसाठी पृथ्वी राहण्यायोग्य ठेवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *