शहरात डॉक्टर कुटुंबावर हल्ला
नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर रस्ता परिसरात रविवारी (दि.17 ऑगस्ट) रात्री डॉक्टर परिवारावर काही लोकांनी हल्ला केला. डॉ. जाहिद शेख यांच्या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यात त्यांच्यासह त्यांचे वडील व पत्नीला लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आहे. तर डॉ. शेख यांचे मित्र जतीन जनक आहुजा यांच्यावर लोखंडी रोडने गंभीर हल्ला करून दुखापत करण्यात आली आहे.
डॉ. जाहिद शेख (वय 35, रा. मुकुंदनगर) यांनी तोफखाना पोलिसांना दिलेल्या जवाबात म्हटले आहे की, रविवारी रात्री मुलीचा वाढदिवस साजरा करून ते कुटुंबासह घरी परतत होते. रात्री 9:40 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पत्रकार चौका जवळ त्यांच्या चारचाकीला दुचाकी आडवी लावून कुणाल नारंग या इसमाने त्यांची गाडी थांबविण्यास भाग पाडले. रस्त्यातच नारंग याने डॉ. शेख यांना लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान डॉ. शेख यांना वाचविण्यासाठी त्यांचे वडील पुढे सरसावले, पण त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. एवढ्यावर न थांबता नारंगने फोन करून आणखी तीन ते चार जणांना घटनास्थळी बोलवले. त्यात जयेश लालवानी, पारस लालवानी यांची नावे उघड झाली असून, इतर दोघेजण अद्याप ओळख पटलेले नाही. या सर्वांनी मिळून डॉ. शेख यांना तसेच त्यांच्या पत्नीला देखील शिवीगाळ करुन मारहाण केली. घटनास्थळी डॉ. शेख यांचा मित्र जतीन जनक आहुजा पोहचताच संशयित आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. जयेश लालवानी याने हातातील लोखंडी रॉडने जतीनच्या डोक्यात व डोळ्यावर वार केले. त्यामुळे जतीन जखमी झाले व ते जमिनीवर कोसळले. त्यांनाही संशयित आरोपींनी खाली पडल्यानंतरही मारहाण केली. दरम्यान नागरिकांची गर्दी जमा झाल्याचे पाहून संशयित आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.