अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी
अन्यथा महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- मौजे हिंगणी दुमाला (ता. श्रीगोंदा) येथील जमिनीची दोन वेळेस खरेदीखत करुन नियमाची पायमल्ली करणाऱ्या दुय्यम निबंधक श्रीगोंदा (श्रेणी-1) यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा उपनिबंधक कार्यालयात देऊन सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी महाराष्ट्र दिनी (दि.1 मे) जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, श्रीगोंदा तालुक्यातील मौजे हिंगणी दुमाला येथील शहाजी विठोबा शिंदे रहिवासी असून शेती व्यवसाय करतात. गट नंबर 437 दत्तात्रय प्रकाश घोलप (रा. ढवळपुरी, ता. पारनेर) यांनी विक्री काढलेली ती जमीन शहाजी शिंदे यांनी खरेदी घेण्याचे ठरवले. गुंठ्याचे खरेदी होत नसल्याने गुंठेवारीच्या कायद्याची शिथीलता आल्यानंतर खरेदीखत करण्याचे ठरले. त्यांना मूळ जमीन मालकास 1 लाख रोख व 1 लाख 9 हजार कॅनरा बँकेचा धनादेश 31 जानेवारी 2024 रोजी देण्यात आला. 31 जानेवारी 2024 रोजी दत्तात्रय घोलप यांना रजिस्टर ताबेसाठेखत साक्षीदार असे लिहून नोंदवून दिले. त्याप्रमाणे घोलप यांनी शहाजी शिंदे यांना ताबा दिला होता. गट नंबर 437 मधील 0.9 क्षेत्राचे रजिस्टर साठेखत व कुलमुखत्यारपत्र लावून दिलेले असून त्याची नोंद ऑनलाईन असूनही दुय्यम निबंधक श्रीगोंदा (श्रेणी 1) यांनी शासन नियमाची पायमल्ली करून आर्थिक हितसंबंध तयार करून रामदास ढवळे यांना बेकायदेशीर साठेखत करून देण्यात आले.
साठे खतावरून पुन्हा 29 मार्च 2014 रोजी मुखत्यारपत्राच्या आधारे खरेदी खत लिहून नोंदविण्यात दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांच्याशी संगणमत करून घेण्यात आले आहे. हे खरेदीखत बेकायदेशीर असून, घोलप यांच्याकडून रजिस्टर ताबा, साठेखत व रजिस्टर कुलमुखत्यारपत्र झालेले माहीत व ऑनलाईन असताना दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांनी संगणमत करून बेकायदेशीर दस्त नोंदविला असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या क्षेत्राच्या दस्त नोंदणीसाठी वरिष्ठ कार्यालयाची पूर्वपरवानगी बंधनकारक असताना दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांनी तडजोड करून शासन अधिनियमाची पायमल्ली करून खरेदी दस्त नोंदणी केली आहे. राजाराम धावडे यांनी यांच्या खरेदीखताप्रमाणे लगत जमीन राजाराम धावडे यांनी गट नंबर 437 लगत 0.9 क्षेत्रालगत नसतानाही सदर खरेदीखतावर शहाजी विठोबा शिंदे यांनी रजिस्टर ताबे साठेखत देऊन नोंदवून दिलेले असल्याने त्याचा ताबा वहिवाट आहे. असे असताना राजाराम धावडे यांनी दत्तात्रय घोलप यांच्याकडून बेकायदेशीर साठेखत व कुलमुखत्यार पत्र त्यावरून खरेदी केले आहे. सदरच्या दस्तावरुन दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांनी नियमबाह्य खरेदीखत होण्यासाठी अर्थपूर्ण संबंध ठेवून नियमबाह्य साठेखत व मुखत्यारपत्राचा खरेदी नोंदविले असल्याचे म्हंटले आहे.
दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांनी शासन अधिनियमाची पायमल्ली कर्तव्यात कसूर केलेला असून, त्यांच्यावर तात्काळ फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ बडतर्फ करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.
