• Fri. Sep 19th, 2025

शहरात द केरला स्टोरी चित्रपटाच्या नावाखाली धार्मिक द्वेषाचे राजकारण

ByMirror

May 12, 2023

चित्रपट गृहात धार्मिक द्वेष पसरविणारे भडकाऊ भाषण करणार्‍यांवर गुन्हे दाखल व्हावे

समाजवादी पार्टीची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- चित्रपट गृहात द केरला स्टोरी चित्रपटासाठी जमलेल्या समुदायासमोर धार्मिक द्वेष पसरविणारे भडकाऊ भाषण करणार्‍या सुमित वर्मा व त्याच्या सहकार्‍यांवर हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी शुक्रवारी (दि.12 मे) कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना सदर मागणीचे निवेदन दिले.


बुधवारी (10 मे) रोजी आशा टॉकीज चित्रपट गृहात केरला स्टोरी चित्रपटासाठी जमलेल्या जनसमुदाया समोर मुस्लिम समाजाबद्दल अपशब्द वापरून शहरातील वातावरण दूषित करण्यासाठी व धार्मिक द्वेष पसरण्याच्या उद्देशाने सुमित वर्मा यांनी भाषण केले आहे. त्या भाषणाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर देखील पसरविण्यात आलेले आहेत. मुस्लिम समाजाच्या भावना दुखाविणारे भाषण करताना या समाजातील महिलांना देखील टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे समस्त मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. तर या कृत्यास प्रोत्साहन देणारे आशा टॉकीज चित्रपट गृहाचे संचालक व मालक देखील जबाबदार असल्याचा आरोप समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.

धार्मिक द्वेष पसरवून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याबद्दल सुमित वर्मा व यावेळी उपस्थित अन्य सहकारी यांच्यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार हेट स्पीच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच आशा चित्रपट गृहाच्या संचालक व मालकावर देखील या कृत्याला परवानगी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी समाजवादी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

द केरला स्टोरी या काल्पनिक चित्रपटावरुन दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम केले जात आहे. चित्रपट गृहात विशिष्ट जनसमुदाय जमा करुन त्यांच्या समोर मुस्लिम समाजाबद्दल आक्षेपार्ह व द्वेष पसरविणारे भडकाऊ भाषण म्हणजे एकप्रकारे शहराची शांतता भंग करण्याचे कृत्य आहे. शपथ देण्याच्या नावाखाली युवक-युवतींच्या माथी भडकविण्याचे काम चालविण्यात आले आहे. तरी पोलीस प्रशासनाने या प्रकाराला वेळीच प्रतिबंध करुन संबंधितांवर कारवाई करावी. -अजीम राजे (जिल्हाध्यक्ष, समाजवादी पार्टी)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *