स्थायी समितीचे सभापती गणेश कवडे यांचा सत्कार
कवडे यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिका स्थायी समितीच्या सभापतीपदी गणेश कवडे यांची निवड झाल्याबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, सामाजिक वनीकरण विभागाचे वन रक्षक अधिकारी अफसर पठाण, नेमाने, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, काका शेळके आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, गणेश कवडे यांनी नगरसेवक पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम केले आहे. त्यांची स्थायी समितीच्या सभापतीपदी झालेली निवड शहराच्या विकासाला चालना देणारी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना गणेश कवडे यांनी डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाचे उत्तमप्रकारे सामाजिक कार्य सुरु आहे. सर्वच क्षेत्रात संस्था सामाजिक योगदान देत असून, त्यांच्या सामाजिक कार्याला महापालिकेच्या माध्यमातून सहकार्य राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.