• Sun. Mar 16th, 2025 10:09:56 PM

लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Mar 3, 2023

विद्यार्थ्यांचे बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण

जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी शिकणे काळाची गरज -वसंतराव कापरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- मधुर बहुउद्देशीय संस्था संचालीत लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. रंगीबेरंगी पोशाख परिधान केलेल्या चिमुकल्यांनी नाटिका, नृत्य अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास उपस्थित पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.


वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे विश्‍वस्त वसंतराव कापरे व मीरा पाटील्स टायनी टॉट्सच्या संचालिका मीरा पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मानसिंग पाटील, तारांगण प्री-प्रायमरी स्कूलचे अध्यक्ष जगदीश देशमुख, स्थायी समितीचे माजी सभापती कुमारभाऊ वाकळे, नगरसेवक मदन आढाव, कमल सप्रे, रीताताई भाकरे, अशोक बडे, शिवसेना नेते लोभाशेट कातोरे, संस्थेचे चेअरमन अर्जुन खिळे, सचिव मोहिनी खिळे, खजिनदार अजित काकडे, विश्‍वस्त सविता खिळे, डॉ. देविदास खिळे आदींसह शिक्षिका, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसंतराव कापरे म्हणाले की, विज्ञान-तंत्रज्ञानाने जग जवळ आले असून, जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी ही भाषा शिकणे काळाची गरज बनली आहे. इंग्रजीचे शिक्षण आत्मसात करताना त्याला संस्काराची देखील जोड आवश्यक आहे. आजची पिढी सुसंस्कारी शिक्षणाने यशस्वी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मीरा पाटील म्हणाल्या की, शिक्षणासोबत मुलांचा सर्वांगीण गुणांचा विकास होतो. लहान वयातच शिक्षण व संस्काराचा पाया रचला जातो. स्पर्धामय युगात इंग्रजी शिक्षण महत्वाचे बनले असल्याचे त्यांनी सांगितले. संस्थेचे चेअरमन अर्जुन खिळे यांनी प्रास्ताविकात लिटिल जीनियस प्री-प्रायमरी स्कूलमध्ये सुरु असलेल्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. मधुरा खिळे यांनी संस्थेच्या गुणवत्तेचा वार्षिक अहवाल सादर केला. मानसिंग पाटील यांनी पुस्तकी ज्ञानाबरोबर विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव मिळण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम उपयुक्त ठरत असल्याचे सांगितले. स्कूलचे आजी व माजी विद्यार्थी यांच्या पालकांनीही शाळेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.


प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत केले. लहान लहान मुलांनी सादर केलेल्या बहारदार सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थित नागरिक व पालक वर्ग मंत्रमुग्ध झाले. शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये राबविण्यात आलेल्या विविध कला, क्रीडा व शैक्षणिक स्पर्धांचे बक्षीस वितरण उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर अवॉर्ड आरोही मेटे हिला देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल कुलकर्णी यांनी केले. आभार पुनम गायकवाड यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहित ताकपेरे व सर्व शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *