भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या उपोषणाला यश
हॉटेलची मोडतोड, जीवे मारण्याची धमकी व जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचे प्रकरण भोवले
अहमदनगर (प्रतिनिधी)- सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदारांनी हॉटेलची तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी देऊन जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याप्रकरणी अखेर रविवारी (दि.28 ऑगस्ट) शेवगाव पोलीस स्टेशनला शारदा अंतोन गायकवाड (रा. नागापूर) यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप अनुसूचित जाती महिला मोर्चाच्या वतीने संबंधितांवर गुन्हे दाखल होण्यासाठी नुकतेच जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले होते. महिलांनी केलेल्या आंदोलनाला यश आले आहे.
फिर्यादी महिला व त्यांचे मेव्हुणे अरुण जगधने 17 ऑगस्ट रोजी खानापुर (ता. शेवगाव) येथे सकाळी नशा हॉटेलवर असताना सरपंच व त्याच्या साथीदाराने येऊन शिवीगाळ सुरु केली. त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी हॉटेलच्या खुर्च्यांची मोडतोड केली. तर हॉटलकडे जाणारा रस्ता जेसीबीच्या सहाय्याने (चर) खोदून बंद केला आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद शारदा अंतोन गायकवाड यांनी दिली आहे. या फिर्यादीवरुन सरपंच अण्णा शाहू जगधने, आजिनाथ अण्णा जगधने, रवी रामनाथ जगधने, राजू रामनाथ जगधने, काकासाहेब शाहू जगधने, एकनाथ दगडू जगधने, सोमनाथ रामनाथ जगधने व किसन चव्हाण यांच्यावर भादवि कलम 341, 427, 143, 147, 504, 507 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.