गावोगावी जाऊन ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पावसाळ्यात होणारे संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या जागृतीचे अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानाचा प्रारंभ दरेवाडी (ता. नगर) येथून करण्यात आला. पावसाळ्यात होणारे आजार टाळण्याकरीता केल्या जाणार्या उपाययोजनांची माहिती गावोगावी जाऊन शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना देण्यात येत आहे.
फाऊंडेशनचे सचिव डॉ. धनाजी बनसोडे म्हणाले की, पावसाळा सुरू झाल्यानंतर दूषित पाणी तसेच बदलत्या हवामानामुळे आजार वाढू लागतात. लहान मुलांमध्ये याचा प्रभाव अधिक दिसून येतो. जिल्ह्यात सध्या सर्दी, खोकला व तापची साथ सुरु असून, ढगाळ पावसाचे वातावरण, अस्वच्छता व दुषित पाणीमुळे या साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. पावसाळ्यात धरण, तलाव, विहिरीत नवीन पाण्याची आवक होत असून, काही ठिकाणी पाणीपुरवठा करणार्या योजनांचे पाईप फुटल्याने त्यामध्ये दुषित पाणी मिसळून पिण्याचे पाणी प्रदुषित होते. मुख्यत: अस्वच्छ पाण्यामुळे आजाराचे प्रमाण वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.
फाऊंडेशनच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे यांनी सध्या जिल्ह्यात पावसाळ्यात साथीचे आजार झपाट्याने वाढत असल्याने हे आजार टाळण्यासाठी जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. गावातील शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांना जागरुक करुन आजार टाळण्यासाठी माहिती दिली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
नगर तालुक्यात 1530 व जामखेड 655 ज्येष्ठ नागरिकांना वाडी-वस्ती व त्यांच्या पर्यंत जाऊन प्रत्यक्ष व शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यातील आजार व कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये ग्रामस्थ व शालेय विद्यार्थ्यांना हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवावे, कार्यालय घरांची स्वच्छता ठेवावी, सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या सफाईबाबत अधिक काळजी घ्यावी, परिसराची स्वच्छता ठेवावी, कच्चे फळे, भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात, पाण्यात जंतुनाशकांचा पुरेसा वापर करावा, गरजेनुसार पाणी उकळून पिण्याचे आवाहन करण्यात आले. तर कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी कोरोना लसीकरणाचे सर्व डोस घेणे, नियमित मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्याची माहिती देऊन, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे टाळण्याचे स्पष्ट करण्यात आले. यावेळी हरिभाऊ कर्डिले, सभापती डॉ. सुनील बोराडे, डॉ. डी. वि. बनसोडे तालुका आरोग्य अधिकारी, पंचायत समितीचे सदस्य, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक व फाऊंडेशनचे सदस्य उपस्थित होते.