अहमदनगर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय;
पत्नी व दोन अल्पवयीन मुलांसाठी दरमहा 25 हजार रुपये कायमस्वरूपी पोटगीचे देण्याचे अर्जदार पतीला आदेश
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर येथील दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर), अहमदनगर यांनी हिंदू विवाह याचिकेमध्ये दिनांक 28 जुलै 2026 रोजी महत्त्वपूर्ण निर्णय देत भारतीय सैन्य दलातील पतीने पत्नीविरुद्ध दाखल केलेली घटस्फोटाची याचिका खर्चासह फेटाळून लावली.
सदर प्रकरणात अर्जदार पतीने हिंदू विवाह कायदा 1955 मधील कलम 13(1)(i-a) अंतर्गत पत्नीने विविध प्रकारे क्रूरता केल्याचा आरोप करत विवाह विच्छेदाची मागणी केली होती. तथापि, मा. न्यायालयाने दोन्ही पक्षांचे साक्षी-पुरावे तसेच उपलब्ध कागदपत्रांचे सखोल परीक्षण करून अर्जदाराने केलेले क्रूरतेचे आरोप विश्वासार्ह, ठोस व कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुराव्यांच्या आधारे सिद्ध करण्यात अपयशी ठरल्याचे नमूद केले.
केवळ आरोपांच्या आधारे विवाह विच्छेद मंजूर करता येणार नाही, असा स्पष्ट निष्कर्ष नोंदवत मा. न्यायालयाने पतीची घटस्फोटाची याचिका फेटाळून लावली. तसेच, पत्नी व दोन अल्पवयीन मुलांच्या निर्वाहासाठी मा. न्यायालयाने दरमहा ₹25,000/- इतकी कायमस्वरूपी पोटगी अदा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयातून कौटुंबिक वादांमध्ये केवळ आरोप करणे पुरेसे नसून, ते आरोप ठोस, विश्वासार्ह व कायदेशीरदृष्ट्या ग्राह्य पुराव्यांद्वारे सिद्ध करणे आवश्यक असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.
सदर प्रकरणात प्रतिवादी पत्नीच्या वतीने ॲड. आशिष एस. सुसरे, ॲड. अश्विनी दुधाडे-सुसरे व ॲड. अजिंक्य एस. आंधळे यांनी काम पाहिले. प्रतिवादी पत्नीच्या वतीने ॲड. आशिष एस. सुसरे यांनी अर्जदार पतीचा घेतलेला उलटतपास हा खटल्यातील महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ठरला. तसेच, मा. सर्वोच्च न्यायालयाचे विविध न्यायनिवाडे सादर करून पत्नीची बाजू प्रभावीपणे मांडण्यात आली.
