करिअर मार्गदर्शन; माजी विद्यार्थ्यांचा सन्मान
कष्टातून शिक्षण घेणारे विद्यार्थीच उद्याचे यशस्वी नागरिक -डॉ. पारस कोठारी
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रपंचासाठी उद्योग-व्यवसाय व नोकरी करत अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी धडपड करणाऱ्या हिंद सेवा मंडळ संचलित भाई सथ्था नाईट हायस्कूलमधील इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेनिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या. यासोबतच त्यांच्या पुढील शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीसाठी मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी असलेले पै. महेश लोंढे नगरसेवकपदी निवडून आल्याबद्दल तसेच सिव्हिल इंजिनिअर हनुमान डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला.
पेमराज सारडा ज्युनिअर कॉलेजचे चेअरमन डॉ. पारस कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास रात्र शाळेचे प्राचार्य सुनील सुसरे, ज्येष्ठ शिक्षक गजेंद्र गाडगीळ, महादेव राऊत, शरद पवार, अमोल कदम, शिवप्रसाद शिंदे, उज्वला साठे, बाळू गोरडे, संदेश पिपाडा, मंगेश भुते, कैलास करांडे, प्रशांत शिंदे, अशोक शिंदे, स्वाती होले, अनिरुद्ध देशमुख, अनिरुद्ध कुलकर्णी, अनुराधा दरेकर, वृषाली साताळकर, वैशाली दुराफे, अविनाश गवळी, मनोज कोंडेजकर, कैलास बालटे आदी शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते. रात्र शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
प्रास्ताविकात शरद पवार यांनी शाळेच्या वतीने उपलब्ध असलेल्या विविध शैक्षणिक सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण, तसेच मासूम संस्थेच्या माध्यमातून मिळणाऱ्या व्यावसायिक प्रशिक्षणाची माहिती दिली. यावेळी दहावी व बारावीनंतर करिअरच्या विविध संधींबाबत विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. पारस कोठारी म्हणाले की, रात्र शाळेत सहकार्याची भावना व मैत्रीपूर्ण वातावरणात शिक्षण दिले जाते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास घडवण्याचे काम करत आहेत. उपजीविका भागवून शिक्षणाची भूक भागवणारे विद्यार्थी अत्यंत कष्टाने शिकत असून ‘शिकला तोच जीवनात घडला’ हे येथे खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळते. रात्र शाळेतून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. यंदाही विद्यार्थ्यांनी उत्तम यश संपादन करावे, तसेच अर्धवट शिक्षण सोडलेल्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी रात्र शाळेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
माजी विद्यार्थी व नगरसेवक पै. महेश लोंढे यांनी सांगितले की, रात्र शाळेतूनच सामाजिक कार्याची ऊर्जा मिळाली. महिला व युवकांनी राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा, त्यामुळे विकासाला योग्य दिशा मिळेल. सिव्हिल इंजिनिअर हनुमान डोंगरे म्हणाले की, रात्र शाळेत शिक्षण घेऊन मी यशस्वी उद्योजक होऊ शकलो. या शाळेने मला दिशा दिली असून गुरुजनांचे उपकार कधीही फेडता येणार नाहीत. यावेळी रात्र शाळेच्या विद्यमान चेअरमन ज्योती कुलकर्णी यांनी दूरध्वनीद्वारे विद्यार्थ्यांना शुभेच्छा संदेश दिला.
विद्यार्थ्यांच्या यशासाठी शाळेत नियमित वर्गांसह रविवारीही विशेष वर्ग घेण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष दिले जात असून तळमळीने शिक्षण दिले जाते. शिक्षक आई-वडिलांप्रमाणे माया लावत असल्याने अनेकांच्या डोळ्यांत यावेळी भावनांचे अश्रू तरळले. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून जीवनाला आकार देण्यासाठी आहे, अशी भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी पायल पोटे, साक्षी निमसे, प्रतिभा जाधव, वंदना मलठणकर, सुषमा उमाप, वैष्णवी देशमुख, अंजली नांगरे, पूजा साळवे, सिद्धी हुच्चे, मनोज साठे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करून रात्र शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माया पाटोळे, अंजली नांगरे व रेश्मा गांधी यांनी केले, तर आभार ज्येष्ठ शिक्षक गजेंद्र गाडगीळ यांनी मानले.
नगरी ग्लोबल फाऊंडेशन (अमेरिका) च्या वतीने भाई सथ्था नाईट हायस्कूलला शुध्द पाण्यासाठी आर.ओ. प्लांट देण्यात आला आहे. ते बसविण्यासाठी इयत्ता 10 वी व 12 वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेला आर्थिक मदत दिली. याबद्दल शाळेच्या वतीने नगरी ग्लोबल फाऊंडेशन व विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले आहे.
