उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा संवेदनशील निर्णय
रविवारी भोलेनाथ मंदिर परिसरात साध्या स्वरूपात जयंती कार्यक्रम
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने यंदा संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी संत गुरु रविदास महाराज यांची जयंती असून, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी जयंतीचे भव्य आयोजन करण्याचे नियोजन केले होते. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा समतावादी नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे, पदाधिकाऱ्यांनी व समाज बांधवांनी एकत्रितपणे जयंती साध्या स्वरूपात साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
स्वर्गीय अजित पवार यांचे बहुजन समाजावर विशेष प्रेम होते, हे सर्वश्रुत आहे. चर्मकार समाजासाठी शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून दोन भूखंड उपलब्ध करून देण्यात आले असून, त्या भूखंडावर संत गुरु रविदास महाराज यांच्या विकास केंद्राचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या सर्व विकास कामांसाठी आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून स्वर्गीय अजित पवार यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामुळे चर्मकार समाज आमदार संग्राम जगताप आणि स्वर्गीय अजित पवार यांचा कायम ऋणी राहील, अशी भावना समाज बांधवांनी व्यक्त केली आहे.
आतापर्यंत चर्मकार समाजाची भूमिका ही सर्वसमावेशक राहिलेली असून, स्वर्गीय अजित पवार हे अत्यंत प्रेमळ आणि समतावादी नेतृत्व होते, याची समाजाला पूर्ण जाणीव आहे. त्याच भावनेतून आणि दुःखद घटनेप्रती आदर व्यक्त करण्यासाठी राष्ट्रीय चर्मकार महासंघाने संत गुरु रविदास महाराज यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
याच अनुषंगाने जयंतीचे ठिकाण देखील बदलण्यात आले असून, रविवार, 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता भोलेनाथ मंदिर, भोलेनाथ चौक, परशुराम खुंट, धरती चौक येथे जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी जयंतीचे आयोजन करण्यात आले असल्याची नोंद सर्व समाज बांधवांनी घ्यावी व कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव साळवे, उपाध्यक्ष राजेंद्र बुंदेले, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब केदारे, सचिव माणिक नवसुपे, शहराध्यक्ष अतुल देव्हारे व अभिनव सूर्यवंशी यांनी केले आहे.
