नगररचना विभागाचा स्पष्ट अहवाल असूनही सुनावणी रखडली; शिवसेनेचा प्रशासनावर गंभीर आरोप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- तवले नगर परिसरातील साई एंजल इंटरनॅशनल स्कूलने केलेल्या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भातील सविस्तर निवेदन शिवसेना अोबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांना पाठविले आहे.
साई एंजल इंटरनॅशनल स्कूलच्या अनधिकृत बांधकामाबाबत दि. 29 मे 2025 रोजी प्रभाग अधिकारी, सावेडी (अहिल्यानगर) यांच्याकडे तक्रार अर्ज सादर करण्यात आला होता. या तक्रारीनंतर प्रभाग अधिकाऱ्यांनी नगररचना विभागाकडे अभिप्राय मागविला. त्यानुसार नगररचना विभागाने दि. 19 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या अहवालात स्पष्टपणे नमूद केले आहे की, प्रत्यक्ष जागेची पाहणी केल्यानंतर बांधकाम परवानगीच्या अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले आहे.
नगररचना विभागाच्या अहवालानुसार, बांधकाम परवानगीमध्ये पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेमध्ये शैक्षणिक हॉल उभारण्यात आला आहे. तसेच पहिल्या मजल्यावर रूम क्रमांक 6-अ शेजारील पॅसेजमध्ये अतिरिक्त शैक्षणिक रूम बांधण्यात आली आहे. ही सर्व बांधकामे परवानगीविना करण्यात आलेली असून, त्यावर नियमाप्रमाणे कारवाई करणे आवश्यक असल्याचे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
तथापि, नगररचना विभागाचा अहवाल असूनही प्रभाग अधिकारी यांनी उपआयुक्त स्तरावर सुनावणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनदेखील आजपर्यंत कोणतीही सुनावणी झालेली नाही. याच काळात संबंधित शाळेने आणखी एका नवीन मजल्याचे बांधकाम सुरू केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. जर या नवीन बांधकामास नगररचना विभागाने परवानगी दिली असेल, तर ती अत्यंत गंभीर बाब असून यामागे आर्थिक तडजोडीचा संशय व्यक्त केला जात आहे. अनधिकृत बांधकाम सिद्ध झालेल्या शाळेला पुन्हा वाढीव बांधकामाची मुभा देणे अथवा सुनावणी जाणीवपूर्वक टाळणे म्हणजेच उपायुक्त व नगररचना विभागातील काही अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार केले असावेत, असा आरोप शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
याबाबत बोलताना शिवसेना अोबीसी विभागाचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत (काका) शेळके यांनी स्पष्ट केले की, जर अशा प्रकारे नियमबाह्य बांधकामांना परवानगी दिली जात असेल, तर अहिल्यानगर शहरातील इतर सर्व नागरिक व व्यावसायिकांनाही तशीच मुभा द्यावी लागेल. सध्या पालिका ज्या पद्धतीने संबंधित शाळेवर निवासी कर लावून मेहेरबान आहे, त्याच न्यायाने इतर व्यावसायिकांनाही निवासी कर लावावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराने बरबटलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, तसेच साई एंजल इंटरनॅशनल स्कूलच्या अनधिकृत बांधकामावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
