• Sat. Jan 31st, 2026

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत बाल आरोग्य तपासणी शिबिराला प्रतिसाद

ByMirror

Jan 30, 2026

बालकांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी आनंदऋषी हॉस्पिटल कटिबद्ध -डॉ. सुधाताई कांकरिया

अद्ययावत एनआयसीयू, तज्ज्ञ डॉक्टरांची टीम व अल्पदरात सर्व प्रकारचे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- जन्मलेल्या नवजात बालकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत दर्जेदार, आधुनिक व सर्वसमावेशक आरोग्यसेवा देणारे आनंदऋषी हॉस्पिटल हे समाजासाठी आशेचे केंद्र ठरत आहे. आजची लहान मुले ही उद्याच्या भारताचे भाग्यविधाते आहेत. त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि सुदृढ आरोग्यासाठी आनंदऋषी हॉस्पिटल कटिबद्ध असून, भविष्यातील सक्षम भारत घडविणाऱ्या बालकांना नवसंजीवनी देण्याचे कार्य येथे सातत्याने सुरू आहे, असे प्रतिपादन डॉ. सुधाताई कांकरिया यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल ॲण्ड मेडिकल रिसर्च सेंटर येथे स्वातंत्र्यसैनिक स्व. कन्हैय्यालालजी व स्व. मानकंवरबाई कांकरिया यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कांकरिया परिवाराच्या वतीने आयोजित बालकांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नेत्र तज्ञ डॉ. प्रकाश कांकरिया, रत्नप्रभाजी छाजेड, प्रकाश कटारिया, जैन सोशल फेडरेशनचे संतोष बोथरा, डॉ. वसंत कटारिया, सतीश लोढा, मानकचंद कटारिया, प्रकाश छल्लाणी, अभय गुगळे, सुभाष मुनोत, वसंत चोपडा, डॉ. आशिष भंडारी, पेडियाट्रिक सर्जन डॉ. रुपेश सिकची, बालरोग तज्ञ डॉ. गणेश गव्हाणे, डॉ. विजय साठे, डॉ. वैभवी वंजारे आदी मान्यवर उपस्थित होते.


पुढे डॉ. कांकरिया म्हणाल्या की, स्वातंत्र्यसैनिक असलेले स्व. कन्हैय्यालालजी व स्व. मानकंवरबाई कांकरिया या आमच्या आई-वडीलांचा सामाजिक वारसा आंम्ही कांकरिया परिवार आरोग्यसेवेच्या माध्यमातून पुढे घेऊन जात असल्याचे स्पष्ट केले.


प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया यांनी सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या उभारणीपासून कांकरिया परिवाराचा मोलाचा वाटा आहे. सुरुवातीच्या काळात वर्गणी गोळा करून गोरगरीबांसाठी आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात आली. आज या शिबिरांचे स्वरूप व्यापक झाले असून, त्याचा लाभ मोठ्या प्रमाणावर गरजू रुग्णांना मिळत आहे. रोटरी व इतर सामाजिक संस्थांच्या माध्यमातूनही त्यांचे सामाजिक कार्य अखंड सुरू आहे. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी व स्त्री जन्माचे स्वागत करण्यासाठी त्यांनी चालविलेली चळवळ देशभरात आदर्श ठरली असून, या कार्यामुळे त्यांनी राष्ट्रीय स्तरावर ओळख निर्माण केली आहे, असेही त्यांनी नमूद केले.


डॉ. विजय साठे यांनी माहिती देताना सांगितले की, आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 26 बेडचे अद्ययावत एन.आय.सी.यू. उपलब्ध आहे. नवजात बाळांच्या श्‍वासोच्छवासातील अडचणी, बालदमा, ए.आर.डी.एस. (श्‍वसनदाह), नवजात कावीळसाठी फोटोथेरपी व रक्त बदलण्याची सुविधा येथे उपलब्ध आहे. तसेच अनुवंशिक व जन्मजात आजारांवर अचूक निदान व प्रभावी उपचार दिले जात असल्याचे सांगितले.


डॉ. रुपेश सिकची यांनी सांगितले की, सर्व बालकांसाठी आवश्‍यकतेनुसार ओपन तसेच दुर्बिणीद्वारे (लॅप्रोस्कोपी) सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया हॉस्पिटलमध्ये केल्या जातात. गरीब व श्रीमंत रुग्णांसाठी समान दर्जाच्या सुविधा दिल्या जात असून, गोरगरीब रुग्णांना शासनाच्या योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया, तर इतरांसाठी अल्पदरात उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. नुकतेच चार वर्षांच्या मुलीच्या किडनी ब्लॉकवरील शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपी प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या माध्यमातून यशस्वी करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.


डॉ. वैभवी वंजारे यांनी बालकांना मोबाईलच्या व्यसनापासून दूर ठेवणे, योग्य आहार, नियमित व्यायाम व सर्वांगिण विकासासाठी आवश्‍यक मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगितले. तसेच शासनाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या मोफत लसीकरणा व्यतीरिक्त इतर महागड्या लसीकरण सुविधा हॉस्पिटलमध्ये अल्पदरात उपलब्ध करून दिल्या जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या शिबिरात 91 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार प्रकाश छल्लाणी यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *