• Sun. Jan 25th, 2026

मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन राष्ट्रीय बालिका दिन व आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा

ByMirror

Jan 25, 2026

भाजप अनुसूचित जाती मोर्चाचा उपक्रम


मुली शिकल्या तरच समाज प्रगती शक्य -सुनील सकट

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नालेगाव येथे भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने राष्ट्रीय बालिका दिन व आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत मुलींसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे सरचिटणीस सुनील सकट यांच्या पुढाकाराने हा सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आला.


समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण व्हावा आणि भविष्यात त्या विविध क्षेत्रात यशस्वी व्हाव्यात या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी परिसरातील महिला, मुली व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


सुनील सकट म्हणाले की, राष्ट्रीय बालिका दिन व आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन हे केवळ औपचारिक साजरे करण्याचे दिवस नाहीत, तर समाजाला दिशा देणारे महत्त्वाचे दिवस आहेत. आजही अनेक ठिकाणी मुलींच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होताना दिसते. ही परिस्थिती बदलण्याची गरज आहे. मुली शिकल्या तर कुटुंब सुशिक्षित होते, कुटुंब सुशिक्षित झाले तर समाज प्रगत होतो आणि समाज प्रगत झाला तर राष्ट्र बळकट होते. त्यामुळे प्रत्येक पालकाने आपल्या मुलीच्या शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शिक्षण हीच खरी संपत्ती आहे, जी कोणी हिरावून घेऊ शकत नाही.


भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा नेहमीच समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून शिक्षण, आरोग्य व सामाजिक सशक्तीकरणासाठी कार्य करत आहे. मुलींनी आत्मविश्‍वासाने शिक्षण घ्यावे, आपली स्वप्ने मोठी ठेवावीत आणि आपले कर्तृत्व सिद्ध करण्याचे त्यांनी आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *